🕒 1 min read
नाशिक : मराठी साहित्यात विश्वात आपल्या प्रतिभेने तळपणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश करण्याची उपरती अखेर आयोजकांना झाली आहे. त्यासाठी संमेलन गीत पुन्हा नव्याने तयार करण्यात आले आहे. ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या गीतामधून नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामोल्लेख टाळल्यामुळे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. यानंतर आता संमेलन गीताच्या ओळींत बदल करून ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच टाकले नसल्याचे समोर आले. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या २३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे संमेलन गीतामध्ये साम्यवादापासून ते थेट ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ असा उल्लेख होता. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. पण, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती. त्यावरून सावकरप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती.
मिलिंद गांधी यांनी लिहिलेल्या आणि संजय गिते यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीतात ‘स्वातंत्र्याचे सूर्य उगवले अनंत क्षितिजावरती’ अशी ओळ होती. यातील स्वातंत्र्याचे सूर्य म्हणजे सावरकर असे संमेलन कारभाऱ्यांचे म्हणणे होते. पण ‘इतर साहित्यिकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असताना सावरकरांचे नाव का नाही?’ असा सवाल सावरकरप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर मनसे, अभिनव भारत मंदिरासह भगूर येथील सावरकरप्रेमींनी सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. गुरुवारी संमेलन या गीताच्या ओळीतील ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ हा शब्द बदलून ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’ असे नाव घालून नव्याने त्या गीताच्या ऑडिओ, व्हिडिओ फाइल सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय’
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
