मुंबई : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.यानंतर अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे.
मात्र, शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी सरसकट आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली जात आहे. अशातच, सरकार दरबारी निधीचा तुटवडा असून केंद्राने थकीत देणी लवकर द्यावी व महाराष्ट्राशी दुजाभाव न करता मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सत्तेतील नेत्यांनी केली आहे.
तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, ‘ गुरुवारी मोठा निर्णय घेण्यात येईल, शेतकऱ्यांना मदत केली जाईल’ असं विधान केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याने व अन्य कारणाने गुरुवारी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजित पवार बैठकीमध्ये शामिल होऊ शकले असते. मात्र, ही बैठक रद्द करून आज म्हणजेच शुक्रवारी होईल असं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही आता आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अशास्थितीत अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी आठवडाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता असल्याचं वृत्त आल्यानंतर आता अजित पवार हे बैठकीसाठी उपलब्ध असणार असल्याचं कळवल्यानंतर ही बैठक आजच होणार असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. त्यामुळे आज तरी सरकार काही ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पाषाणकर समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बेपत्ता
- भाजपमधील सामान्य कार्यकर्त्यांच्या क्षमतेवर आम्ही नाथाभाऊंची पोकळी भरून काढू : दानवे
- ‘खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल’
- भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता, काँग्रेसमध्ये घरवापसीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू- थोरात
- बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राने काय केले? ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका!


