मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने कहर घातला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन यासह रेमडेसिवीर सारख्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं होतं. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अधिक रेमडेसिवीरची मागणी केली होती.
दरम्यान, सध्या केंद्राने अधिक पुरवठा केल्यामुळे तुटवडा काही प्रमाणात नियंत्रणात आला आहे. मात्र, गेल्या आठवड्यात ब्रुक कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे प्रकरण समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह काही भाजप नेते हे पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
यावेळी भाजप नेते व पोलिसांमध्ये काही शाब्दिक वाद झाल्याचे देखील समजले होते. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं असून आता पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीसांसह दरेकरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. मी स्वत: जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटून मी त्यांना ही मागणी केली होती. फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. सरकार तात्काळ ही कारवाई करेल अशी आशा आहे, असं ते म्हणाले.
यासोबतच, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यासाठी मी सरकारला पत्रं दिलं आहे. त्याला आठ दिवस उलटले तरी अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही, अशी खंत देखील त्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका, डॉक्टरांच्या संपर्कात राहून रुग्ण घरीच बरे होतात’
- लष्करप्रमुख-पंतप्रधानांची भेट; लष्कराची रुग्णालये आता सामान्य नागरिकांसाठी खुली
- ८८ वर्षीय मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात; एम्समधून डिस्चार्ज
- राज्य सरकारचीच चौकशी करा; परमबीर सिंह यांची न्यायालयात याचिका
- ‘राज्याचे आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का ?’ पडळकरांची टोपेंवर जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

