🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिकचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यात औरंगाबाद मनपासह वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालय आणि विविध विभागांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. याकरिता उद्या फेसबुक लाईव्ह पाहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. खा.जलील यांच्या या घोषणेमुळे मोठे नेतेमंडळीपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
खा. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, ‘उद्या औरंगाबादमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक घोटाळा उघडकीस आणणार आहे. याच्यात औरंगाबाद महानगरपालिका , वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालय, बिल्डर आणि व्यापारी यांचा समावेश आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली आणि दबावाला भीक न घातल्यास सर्व जमीन बळकावणारे नक्की तुरूंगात जातील. तसेच कोर्टाच्या आदेशांकडेदेखील दुर्लक्ष कसे केले जाते हे देखील यातून स्पष्ट होईल. मोठ्या भ्रष्टाचारासाठी सरकारी यंत्रणा एकत्रित पद्धतीने कसे काम करते याचे एक उदाहरण या घोटाळ्यातून समोर येईल’.
खासदार झाल्यापासून खा. जलील यांनी शहरातील विविध घोटाळ्यांबाबत आवाज उठवला आहे. मात्र, प्रशासनाने त्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. आता जलील यांनी थेट फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घोटाळ्याची पोलखोल करण्याबाबत ठरवले आहे. उद्या ते कोणत्या प्रकरणाबाबत काय उघड करणार यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. परंतू, त्यांनी ही घोषणा केल्यापासून खाबुगिरी करणाऱ्या अधिकारी, व्यापारी आणि बिल्डरांनी मात्र आतापासूनच देव पाण्यात ठेवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी तर मुंबई नव्हे तर थेट दिल्लीलाही फोन सुरू केल्याचे सुत्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना युध्दात आपला जीव गमावणाऱ्या पोलीस हवालदाराच्या वारसांना मिळाली ६० लाखांची मदत
- ‘महाराष्ट्र देशा’ थेट साष्टपिंपळगावात, मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिणगीचे मशालीत रुपांतर
- चिनी कंपनी VIVO साठी आयपीएलचे दार पुन्हा उघडणार; बनू शकते टायटल स्पॉन्सर
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- राम लल्ला हम आयेंगे, राज ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर !


