मालवण : कोकणने शिवसेनेला मते द्यायची मात्र शिवसेनेने कोकणला काय दिले. आठ दिवस उलटले तरी वादळग्रस्तांना मदत जाहीर होत नाही. वैभव नाईकला प्रशासनात काडीची किंमत नाही, अधिकारी भीक घालत नाही. आठ, आठ दिवस वीज, पाणी या मूलभूत गराजांपासून नागरिक वंचित आहेत. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षा नाहीत त्यामुळे जी मदत शक्य आहे ती नुकसानग्रस्तांपर्यंत पोहचवण्याचे काम भाजप करत आहे. मदतीचे सेवाकार्य यापुढेही सुरूच राहील. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत असा विश्वास भाजप नेते प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त करत नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
तोक्ते चक्री वादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची भाजप नेते निलेश राणे यांनी सोमवारी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू आदी मदतीचे थेट वाटप केले. कौलांची गाडीही सायंकाळ पर्यत येईल. नुकसान ग्रस्तांना कौलांचेही वितरण केले जाईल. असेही निलेश राणे यांनी सांगत ग्रामस्थांना दिलासा दिला. देवबाग गावात नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना दिलासा देताना आम्ही सोबत असल्याचा विश्वास राणे यांनी ग्रामस्थांना दिला. वादळ झाल्या दिवसापासून भाजपचे मदतकार्य सुरू आहे. जनतेला थेट मदत देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. केंद्र शासनाकडूनही मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅकसन फर्नांडिस, अवी सामंत यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक ठिकाणी लाईट आठ दिवस लोटले तरी अद्याप नाही. ज्या ठिकाणी लाईट आली त्याचे श्रेय स्थानिक जनतेचे. त्यांनी मदत केली म्हणून लाईट आली. तुटलेली झाडे जनतेने तोडली, बाजूला केली. त्यामुळे सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत. वीज साहित्याची कमतरता होती. ती दूर केली. बाहेरून आलेले कर्मचारी परत जात होते. जिल्हाधिकारी यांना सांगून त्यांना थांबवले. भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
वादळ म्हणजे आमदारांचा सिजन
वादळ, भूकंप झाला की आमदार वैभव नाईक याचा सिजन चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे. असा प्रहार निलेश राणे यांनी केला. मुख्यमंत्री यांच्याशी बोललेल्या क्लिप व्हायरल करायच्या व आपली पाठ थोपटून घ्यायची कामे आमदार नाईक करत असून जनतेशी त्यांचे देणेघेणे नाही. असा टोला निलेश राणे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई : भाजपाच्या इशाऱ्यानंतर अखेर वृक्ष छाटणीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात मंजूर
- ‘आमदार शिंदे केवळ कोविड सेंटरचे उद्घाटन करुन जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत आहेत’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- लहान मुलांकरिता स्वतंत्र कोविड सेंटरची उभारणी करा; महापालिका आयुक्तांकडे भाजपची मागणी
- ‘..तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’, संजय राऊतांची मार्मिक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

