संगमनेर : संगमनेर शहरातील लोकवस्तीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने संगमनेरकरांना अग्नितांडव अनुभवायला मिळाले. आग आटोक्यात आणण्यात सुमारे अठरा तासांनी यश मिळाले असले, तरी बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत ही आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, बुधवारी सायंकाळी हवेमुळे ही आग पुन्हा भडकली असून, उशिरापर्यंतही आग विझविण्याचे काम सुरू होते. या भयंकर अग्नितांडवात कापसासह २२ कोटींच्या धान्याची राखरांगोळी झाल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
आगीत कापूस गाठी, सोयाबीन, गहू, बाजरी, सरकी पेंड, बारदान आदी जळून खाक झाले. या सर्व मालाची किंमत अंदाजे २२ कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी वर्तविला आहे. आगीत नुकसान झालेल्या मालाचा विमा असल्याची माहिती मिळाली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीची माहिती मिळताच संगमनेर कारखाना, संगमनेर नगरपरिषद, मालपाणी उद्योग समूहासह अकोले, लोणी, राहाता, कोपरगांव, नेवासे, शिर्डी आदीसह जिल्हाभरातील अग्निशामक दलाचे बंब रात्रभर आग विझवत होते. आग लागली त्या वेळी शहरात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीची वार्ता शहरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या घटनेत कापसाच्या १३ हजार १६५ गाठी, नाफेडने खरेदी केलेला ८ हजार ८२३ पोती हरभरा, २५० गोणी मिरी, २४५ पोती सोयाबीन, २१० गोटी गहू, 1 हजार ४०० गोणी बाजरी आणि गोदाम असे तब्बल २२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- चेन्नईच्या सलग पाचव्या विजयात सुरेश रैनाने रचला अनोखा विक्रम
- चेन्नई एक्सप्रेस सुसाट; हैदराबाद संघावर ७ गडी राखुन मात
- ऑक्सिजन अभावी दौंडमध्ये ४ रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप
- अखेर दीपाली चव्हाण प्रकरणी निलंबित वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक
- ‘दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलू नका’ पंकजांनी ठाकरे सरकारला सुनावले

