🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या सहाव्या दिवशी एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आज (रविवार) शरद पवार यांच्यासोबत झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत शिंदे गटाचे २० आमदार सतत संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली आहे. ते मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलत होते.
शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटीत आहेत. शिंदे आणि त्यांच्या गटाने ते ‘खऱ्या शिवसेनेचे’ प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा केला आहे. बंडखोर गटाने म्हटले आहे की, त्यांना विधिमंडळ पक्षात दोन तृतीयांश बहुमत आहे आणि ते सभागृहात आपली शक्ती सिद्ध करेल.
आदित्य ठाकरे म्हणाले, “बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांना लक्ष्य करत त्यांना पक्षात परत घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “बंडखोर आमदारांपुढे एकच पर्याय आहे. एक तर प्रहार पक्षात जा किंवा भाजपात जा. प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार तयार असून ते जिंकायला तयार आहेत. शिवसेनेसोबत लढायचं असेल तर या. तिकडून प्रत्येकाने एकदा राजीनामा पाठवा आणि निवडणूक लढवा. आम्ही तयार आहोत. काही आमदार आपल्याला मेसेज पाठवत आहेत, त्या आमदारांना आपण परत घेऊ शकतो. पण जे दगाबाज आहेत त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येऊ द्यायचे नाही; ही शपथ घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे,” असं देखील आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
