बीड — : कोरोना आपत्तीमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर होत असून विविध विभागातील सर्व स्तरावर त्याचा परिणाम झाला आहे. आर्थिक व सामाजिक बदल दिसून येत असून या काळात अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या, त्यासाठी जनतेचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे. जिल्हा नियोजनाचे काम करताना सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
जिल्हा स्तरीय नियोजन समितीच्या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षिरसागर, आ. नमिता मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अपर्णा गुरव, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
तसेच सभाग्रहात जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य आणि विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. गेल्या एक वर्षात विकासकामे व अन्य लोकाभिमुख कामांना मोठ्या प्रमाणात निर्बंध लागले होते. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आता सर्वांवर आहे, अशा परिस्थितीत सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने जबाबदाऱ्या पार पाडल्यास आम्ही सर्व लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू, कामात कसूर करणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही, अशी तंबीच आज मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिली. जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन -२०२० हा अहवाल प्रकाशित न केल्यावरून देखील मुंडेंनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
कोरोना आपत्ती असताना देखील यावर्षी राज्य शासनाने जिल्ह्याचा नियोजन आराखडा मंजूर करून जानेवारीतच संपूर्ण निधी जिल्ह्यास उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कोणताही निधी कमी केला नाही याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभाराचा ठराव पालकमंत्री मुंडे यांनी मांडला व सभागृहाने त्यास मंजुरी दिली.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘तिजोरीत खडखडाट असतानाही शेतकऱ्याला आमच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली’
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहात का? – नवाब मलिक
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे


