मुंबई :१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या.
अशात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत लस मोफत असल्याची घोषणा केली पण अवघ्या काही मिनिटांतच या दोन्ही जबाबदार मंत्र्यांवर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली आहे. यावरून आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला चांगलच फैलावर घेतले आहे.
लसीकरणाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. त्यामुळेच कुणी कोणत्या घोषणा करतात आणि नंतर ट्विट डिलीट करतात. आज राज्याला सर्वाधिक 4.35 लाख रेमडेसिवीर मिळाल्या. 1750 मेट्रीक टन इतका सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला. या संकटात तुलना करणे योग्य नाही. पण, ज्यांना तीच भाषा समजते, त्यांना सांगायचे तर इतर राज्यांपेक्षा हा दुप्पट कोटा आहे. 1100 हून अधिक व्हेंटिलेटर्स सुद्धा नव्याने महाराष्ट्राला मिळत आहेत. अशा संकटात कांगावेखोरांनी या संकटसमयी लोकांना रोज सकाळी भ्रमित करू नये, अशी अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकारतर्फे प्रत्येक पात्र व्यक्तीचे मोफत लसीकरण होणार आहे, ही बाब कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनातून स्पष्ट केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे. तथापि कोणत्या राज्याला या अभियानाला आणखी गती द्यायची असेल तर राज्यांना लसी विकत घेण्याची स्वायत्तता देण्यात आली आहे. अस देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली, केंद्र सरकारची सूचना
- एमबीबीएसच्या परीक्षांबाबत अमित देशमुखांची महत्वाची माहिती
- लातूर जिल्ह्यातील अपंगांसाठीचे अनुदान अजूनही प्रतीक्षेत
- ‘वसुलीखोर अनिल देशमुखांनंतर आता वसुलीकांडाचे सूत्रधार अनिल परब यांचेही कांड बाहेर येणार’
- भंडारा घटनेनंतरही झोपलेले मनपा प्रशासन अखेर विरार घटनेनंतर झाले जागे! तात्काळ फायर ऑडिटचे आदेश


