पुणे – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या आकडेवारीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप लपवाछपवी करत असून या आकडेवारीबाबत आयुक्तांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.चौकशीच्या मागणीचे पत्रक माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
गेल्या चार वर्षांत महापालिकेच्या कारभारात अनेक आघाड्यांवर भाजपला अपयश आलेले आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणातही तेच अपयश दिसून आले आहे. महापालिकेच्या विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग प्रमुखांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत आढळते. ही आकडेवारी पाहिली तर दहा दिवसांत पाचशे रुग्ण कोरोनाने गेले ही आकडेवारी लपविण्यात आली असे दिसते. विद्युत विभागाच्या अतिरिक्त मुख्य अभियंत्यांनी मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी आणि अंत्यविधीसाठी दिलेले पास यात एवढी तफावत कशी असे स्वतःच विचारल्यामुळे संशय बळावतो. याकरीताच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून गेल्या पंधरवड्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या किती होती हे जाहीर करावे, असे पत्रकात म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यात रोज वेगवेगळी विधाने करून पोपटपंची करीत आहेत. पालिकेत भाजपची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांच्या अपयशाबद्दल ते अवाक्षर काढत नाहीत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी लपविण्याचा भयावह प्रकार महापालिकेतील सत्ताधारी करत आहेत. भाजपच्या या कारभाराबद्दल चंद्रकांत पाटलांनी जाब द्यायला हवा, असेही या पत्रकात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- सकारात्मक बातमी! रुग्ण संख्या घटल्याने शहरातील पाच कोविड सेंटर रिकामे!
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- उस्मानाबाद; १७ गावांमध्ये जनता कर्फ्यू, गावांच्या सीमा पुन्हा बंद
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

