लखनऊ : देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली असून देशात दररोज रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.
काल देशभरात चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून अनेक बड्या देशांनी भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण अक्षरशः तडफडून जीव सोडत आहेत. अशीच एक मन विषन्न करणारी घटना समोर आली आहे.
कृष्णा नगर ठाणा क्षेत्रातील एलडीए कॉलनीतील एका घरामध्ये होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या 65 वर्षीय अरविंद गोयल आणि त्यांचा 25 वर्षाचा मुलगा ईलू गोयल यांचा मृतदेह आढळला आहे. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंध येऊ लागल्यानं शंका आली. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर दरवाजा तोडण्यात आला. यानंतर घरामध्ये दोन मृतदेह आढळून आले. तर, 60 वर्षाची पत्नी रंजना गोयलही अत्यंत गंभीर असल्याचं पाहायला मिळालं. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
कोरोनाची लागण झाल्यानंतर या तिघांवरही घरातच उपचार सुरू होते. दिव्यांग असल्यानं ही महिला चालू शकत नव्हती. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर तिनं सर्वांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा आवाज घराबाहेर गेलाच नाही. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवस आधीच अरविंद गोयल घरामध्ये फिरताना दिसले होते, मात्र त्यानंतर त्यांना कोणीही पाहिलं नाही. कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण परिसर शांत असल्यानं आणि लोक बाहेर पडत नसल्यानं याबाबत कोणालाही भनक लागली नाही. दरम्यान, कुटुंबातील इतर सदस्यांबाबतही काही माहिती मिळाली नसल्यानं त्यांच्यावर पोलिसांकडूनच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर, महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल !
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरिबांच्या लसीकरणाचा खर्च करावा, नाना पटोले यांचे आवाहन
- राष्ट्रवादीला दणका : ज्या पंढरपूर तालुक्यावर भिस्त, तिथंच भाजपाच्या आवताडेंना आघाडी
- राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आव्हानानंतरही बेळगावात भाजपाची मुसंडी
- औरंगाबादेत सर्व प्रतिबंधात्मक आदेशांना १५ मेपर्यंत मुदतवाढ, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

