🕒 1 min read
मुंबई: मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे हा राष्ट्रीय प्रश्न आहे व त्यावर केंद्र सरकारला एक धोरण आखावे लागेल. बेकायदेशीर काही होत असेल तर ते रोखणे हे राज्य सरकारचे काम आहे, पण भोंग्यांच्या प्रश्नावर भाजपच्या उपवस्त्रांना दोन सभा घ्याव्या लागतात, लोकांना भडकविण्याची भाषा करावी लागते. म्हणजे भाजपास वैफल्याने ग्रासले आहे व फक्त धार्मिक तणाव निर्माण करायचा आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
संभाजीनगरात भाजपाच्या उपवस्त्राने सांगितले, ‘मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, नाही तर आम्ही थांबणार नाही.’ उपवस्त्रांना आता उत्तर प्रदेशच्या प्रेमाचे जे अजीर्ण झाले आहे ते गमतीशीर आहे. आधी त्यांना उत्तर प्रदेश व तेथील लोक नजरेसमोर नको होते. हिंदी पट्ट्यातील लोक भारतात राहायलाच लायक नाहीत, असेच त्यांचे म्हणणे होते. योगी आदित्यनाथ यांना कळत नाही. डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला एक माणूस भगवे कपडे घालून फिरतोय. हे किळसवाणे असल्याचे त्यांचे मत होते. आता अचानक हा ‘गोटा’ त्यांना प्रिय झाला व हिंदी भाषिक मंडळींना चुचकारण्याचे काम सुरू झाले. हे मतपरिवर्तन झाले त्यामागे नक्की कोणता व्यवहार आहे ते पाहावे लागेल. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
हिंदू-मुसलमानांतील दंग्यांनी आजवर दोन्ही बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे. संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत शिवसेना हिंदुत्व रक्षणाची ढाल म्हणूनच वावरली आहे, पण या लढाईत भाजपा व त्यांची आजची उपवस्त्रे कोठे होती? आता या मंडळींना हिंदू हिंदूंतच दंगली पेटवायच्या आहेत. मुंबईत मराठी माणसांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले नाहीत. आता हिंदूंनाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरवायचे हा कावा स्पष्ट दिसतो आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यामुळे ‘गधा’धारी कोण हे स्पष्ट झालं”, भाजप आणि मनसेच्या सभेवरून संजय राऊत यांचा टोला
- “फडणवीस ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा…”, संजय राऊतांचा खोचक सवाल
- IPL 2022 KKR vs RR : जीवात जीव आला..! सलग पाच पराभवानंतर कोलकातानं नोंदवला विजय; राजस्थानला दिली मात!
- IPL 2022 KKR vs RR : राजस्थानचं कोलकाताला १५३ धावांचं आव्हान; कप्तान सॅमसननं लढवला किल्ला!
- “दयाभाव आणि दातृत्व सांगणारा सण”; मुख्यमंत्र्यांकडून ईदच्या शुभेच्छा!


