Share

Shivsena : मोदी शिंदे-फडणवीसांकडून मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे करून घेतील – शिवसेना

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गटाची ताकद उद्धव यांच्यावर जड होत आहे. 164 आमदारांच्या पाठिंब्याने शिंदे यांचीच सत्ता महाराष्ट्रात असल्याचे सिद्ध झाले. शिंदे गट आता शिवसेना व पक्षाचे चिन्ह धनुष्यबान वर आपला हक्क सांगत आहेत. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले असून शिवसेना नव्याने उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान आज शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हटलयं सामना अग्रलेखात?

“शिंदे-फडणवीस यांच्या येण्याने महाराष्ट्राला सर्वकाही मिळेल. काहीच कमी पडू दिले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी सांगतात. ते बुलेट ट्रेन देतील, ‘ईडी’च्या चौकश्या बंद करतील. त्या बदल्यात फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे-फडणवीसांकडून करून घेतील. मराठी माणसाचे खच्चीकरण व महाराष्ट्राचा अवसानघात करतील, दुसरे काय होणार!”, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री जाण्यासाठी पाण्यात देव घालून बसले होते-

महाराष्ट्रात शिंद्यांचे सरकार आले व पंतप्रधान मोदी यांनी वचन दिले की, ‘महाराष्ट्राला काहीच कमी पडू दिले जाणार नाही.’ दिल्लीचे सरकार राज्यातून शिवसेनेचा मुख्यमंत्री जाण्यासाठी पाण्यात देव घालून बसले होते. राज्य गेल्याशिवाय महाराष्ट्राला त्याचे हक्क द्यायचे नाहीत असे जणू त्यांनी ठरवूनच टाकले होते. शिंदे व फडणवीस यांच्या सरकारला हवे ते देऊ. त्या बदल्यात ही जोडगोळी भाजपला पुढच्या विधानसभेत दोनशे जागा मिळवून देणार आहे. नशीब विरोधकांचे की, त्यांनी 288 जागांचा वायदा केला नाही. फुटीर गटाचे नेते व मुख्यमंत्री श्री. शिंदे सांगतात, ‘‘त्यांच्याबरोबर गेलेल्या पन्नासेक आमदारांपैकी एकाचाही पराभव होणार नाही.’’ हा महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेवर दाखविलेला अविश्वास म्हणावा की, जसे आमदार विकत घेता येतात तसे मतदारांनाही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास? त्याच वेळी श्री. आदित्य ठाकरे यांनी आव्हान स्वीकारून सांगितले आहे की, ‘‘पळून गेलेले आमदार पुन्हा निवडून कसे येतात ते पाहू.’’

दोन ‘नाईट किंग’ काम करीत होते-

आदित्य ठाकरे म्हणतात त्या विधानात जास्त जोर आहे. श्री. शिंदे यांच्या अंगास नव्याने हळद लागली आहे. त्यामुळे त्यांचे आत्मविश्वासपर बोलणे समजून घेतले पाहिजे. फडणवीस व ते कशा गुपचूप पद्धतीने भेटत होते याचे रहस्यमय किस्से शिंदे यांनी सांगितले. आमदार झोपल्यावर ते निघायचे व उठण्याआधी परत यायचे. अशा प्रकारे हे दोन ‘नाईट किंग’ काम करीत होते. आता दोनशे जागा निवडून आणण्याचा त्यांचा वायदा आहे.

शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने…

मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना त्या सर्व प्रकारास नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून नारायण राणे, छगन भुजबळ वगैरे नेते जसे भावुक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. ते हेलावले, अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे बरेच नाट्य घडले. राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते. शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने राणे यांच्या दशावतारी नाटकावर पडदा पडला आहे.

सगळ्यांनाच भाजपने ‘शुद्ध’ करून घेतले-

त्याचप्रमाणे किरीट सोमय्या वगैरे विद्रोही नाटककारांवरही लोखंडी चणे चावत बसण्याची वेळ आली. संजय राठोड, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव दांपत्यावर कालपर्यंत लिहिलेल्या संहिता मिठी नदीत फेकून देण्याची आफत आता भाजपवाल्यांवर आली आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्यांना तर धरणीने दुभंगून पोटात घ्यावे असेच वाटत असेल. दोन दिवसांत या मंडळींना तुरुंगात टाकण्याचे संवाद आता जाहीर पत्रकार परिषदांतून कोण फेकणार? कारण या सगळ्यांनाच भाजपने ‘शुद्ध’ करून घेतले व देवघरात त्यांच्या प्रतिमा पूजेसाठी ठेवल्या. हे सर्व हिंदुत्वाचे व अन्यायाचे परिमार्जन अशा उदात्त नावाखाली झाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!