औरंगाबाद : शहरात लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २८) होणाऱ्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर काही प्रमाणात लसीकरण होईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. सकाळपासून अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. दुपारपर्यंत हा ३ हजार लसींचा साठा संपून जाईल. याआधी देखील मनपाला अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. पुन्हा तोच प्रकार आता घडत असल्याने लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेला रविवारी (दि. २५) २५ हजार लसींचा साठा मिळाला होता. सोमवारी रेकॉर्डब्रेक ११ हजारांवर लसीकरण झाले. आता कुठे औरंगाबादकरांनी लसीकरणाला गंभीरतेने घेतले असतांना वारंवार लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. सोमवारी शहरात तब्बल ११ हजार जणांना लस देण्यात आली. उर्वरित लसी मंगळवारी वापरण्यात आल्या. त्यात १० हजार लसी संपल्या.
पण बुधवारसाठी शासनाकडून लसींचा साठा मिळालेला नाही. महापालिकेने यापूर्वी आठवडाभरासाठी किमान एक लाख लस मिळावी, अशी मागणी वारंवार केली आहे. पण दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा शासनाकडून दिला जात आहे. बुधवारसाठी महापालिकेकडे फक्त तीन हजार लसी असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
महापालिकेकडील लसींचा साठा २३ एप्रिल रोजी देखील दुपारनंतर संपला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी फक्त आठ केंद्रावर असलेल्या साठ्यातून लसीकरण करण्यात आले. रविवारी लसीकरणाला सुटी देण्यात आली. तीन दिवस लसीकरणात खंड पडल्याने सोमवारी नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या. त्यामुळे सोमवारी ११ हजार ६६१ जणांना लस देण्यात आली तर काल १० हजार ५३ जणांना लसीकरण करण्यात आल्याचे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेच्या टास्क फोर्स प्रमुख उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मेल्ट्रॉन रुग्णालयात रेमडेसिविर चोरीला, आयुक्तांचे चौकशीचे आदेश!
- जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा प्रमुख स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- कागदी घोडे नाचवणे बंद करा; बैठकीत आ. मेटेंचा बीड प्राशासानाला खोचक सल्ला !
- उस्मानाबादेत तब्बल १५ दिवसांनंतर घटली कोराेना मृत्यूची संख्या
- महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या आणखी एका राज्यात लॉकडाउनची घोषणा


