🕒 1 min read
Corporation Election 2022 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एवढेच नाही तर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडले. आपल्याच लोकांनी दगा दिला, असे सांगत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. शिवसेनेतले एकून ३९ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. याचा मोठा फायदा भाजपला झाला. गेले ९ दिवस चाललेल्या या नाट्यात शिवसेनेला रोज नवीन धक्के बसले. अडीच वर्षापूर्वी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन पक्ष सामील होते. या तीन्ही पक्षांना एकत्र आणण्यास खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. दरम्यान शिवसेनेतच फूट पडल्याने महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या स्थापनेदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले बाळासाहेब थोरात यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी कायम राहील की नाही ते ठरवू आमची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडी देखील संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या लवंडेंचे आता काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर अनेक नगरसेवकांनी सत्तेच्या लोभापायी बेडूक उड्या मारल्या. मात्र यांना आता भाजप आणि महाविकास आघाडीने ओळखले. त्यामुळे या दलबदलू नेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाविकास आघाडीत अंतर्गत देखील अनेक पक्ष प्रवेश झाले. त्यामुळे या तीन पक्षांमधील मतभेद देखील आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये चव्हाट्यावर येणार आहेत.
महाविकास आघाडीच्या जोरावर बोलणारे संजय राऊत आता तोंडावर पडले आहेत. शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर देखील त्यांनी आपली भाषा बदलली नव्हती. त्यामुळे याचा फटका शिवसेनेला बसला. राजकारणात कधी काहीही होऊ शकते, असे म्हणतात. पण आता संजय राऊतांवर सर्वच नाराज आहेत. महाविकास आघाडीसोबत संजय राऊत देखील मागे आले आहेत. बाळासाहेबांपेक्षा शरद पवारांचे गुणगाण गाणारे संजय राऊत आता राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करतील का?, हा मोठा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीची सत्ता तर गेली पण येत्या काळात राज्यात महानगरपालिका निवडणुका आहेत. शिवसेनेत मोठी फुट पडली असली तरी शिवसेनेसाठी मुंबई, औरंगाबाद आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरपालिका निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात. यात शिवसेना राष्ट्रवादीला मदत करेल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे, पिंपरीत शिवसेनेचा महापौर?
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बसविण्याचा शिवसेनेने निर्धार केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं टेन्शन वाढलं होतं. खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिकांच्या निमित्तानं पुणे दौरा केला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली होती. “पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत शिवसेनेचा महापौर झालेला नाही याची आम्हाला खंत आहे. मात्र, या शहरांमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असेल. इथली परिस्थिती बदलेल, गणितं बदलतील. पुणेकरांनाही शिवसेनेचा महापौर पाहायला आवडेल,’ असं राऊत म्हणाले होते. त्यामुळे संजय राऊत या विधानावर ठाम असतील तर अजित पवार विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
