मुंबई : कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी दिली.भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात निर्माण केलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार केलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या चाचणी केंद्राची सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आमदार अमीन पटेल यांचेसह जाऊन पाहणी केली.
देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार,जे.जे. रुग्णालयातील कोरोना अर्थात कोविड १९ या विषाणूचे चाचणी केंद्र विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याची दिवसाला १५० चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ती क्षमता १०० पर्यंत वाढविता येणार आहे.
कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत शासन करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था परिश्रम घेत आहे. राज्यातील जनतेनेही शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.


