Share

‘महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको’

Published On: 

मुंबई : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ठेवून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला स्मृतिदिनही साधेपणानेच साजरा केला होता. त्यापूर्वी लाखोंच्या गर्दीच्या साक्षीने होणारी विठुरायाची पंढरीची वारीही साधेपणाने करावी लागली होती. याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, महापरिनिर्वाणदिनी गर्दी न करता, मोजक्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा निर्णय स्वागतार्ह असाच आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण आता अनुयायी म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. आपण बाबासाहेबांकडून प्रेरित होऊन समाजाला पुढे नेऊया. माझ्या आजोबांचे आणि डॉ. बाबासाहेब यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्यामध्ये स्नेह होता. हे ऋणानुंबध आपण समाजापर्यंत नेऊया, असेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने चांगली भूमिका घेतली आहे. आतापर्यंत सर्वधर्मीयांनी सणवार अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात तो साधेपणाने व्हावा. नियमांचे पालन केल्यास या संकटाला रोखता येणार आहे. अभिवादन आणि दर्शनासाठी गृह विभागासह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!