🕒 1 min read
मुंबई : राज्यातील पावसाने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात हाहा:कार माजला असून विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक जण आपापल्या घरात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळई गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियातून टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत….हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री मंत्रालयात… ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत….हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले…https://t.co/daAwJ1stT8
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 23, 2021
तसेच ‘राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ‘पाऊस मोठा आहे, संकट मोठे आहे, परंतु प्रयत्न थिटे आणि नेतृत्व खुजे आहे. अतिवृष्टीची व्याख्या बदलावी लागेल असे मुख्यमंत्री म्हणतायत. त्यांनीही वर्षभर घरी बसून मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- ‘वर्षभर घरी बसून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ भाजपचा टोला
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
