नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.
या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. तर, भाजपच्या सर्वच नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, या कारवाईचे आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये पडसाद उमटत आहेत.
विधानसभेत गोंधळ घातल्यावरून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्यावरून भाजप चांगलेच आक्रमक झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज ( ६ जुलै ) नागपुरातील बडकस चौकात माजी ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे.
यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत एकही शब्द बोलले नाहीत. पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना डावलून धनदांडग्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही’, असा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंधनवाढीवर पंतप्रधान मोदीवर ‘या’ क्रिकेटपटुने साधला निशाणा
- ‘आमदारांना निलंबित करून तुम्ही बालिशपणा केलाय, लढायंच असेल तर या मैदानात!’, निलेश राणेंचे आव्हान
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणे संभाजी भिडेंना भोवले, ८० जणांवर गुन्हा दाखल
- इंग्लंडविरुद्ध मालिकेपुर्वी सिराज करतोय ‘अशी’ तयारी


