नागपूर : फोन टॅपिंग आणि पोलीस बदल्यांप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब आज पोलिसांनी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन नोंदवला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि कार्यकर्ते कालपासून आक्रमक झाले आहेत. यातच आता माजी ऊर्जामंत्री आणि भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र अशांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चौकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ती बाहेर निघतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा राज्य सरकारने तपास करावा. माहितीचा स्रोत विचारण्यापेक्षा ती खरी आहे की खोटी याची चौकशी करावी आणि दोषी मंत्र्यांवर कारवाई करावी. नोटीस पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्य सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. हे चुकीचे आहे. अशा दबाव तंत्राने भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. आम्ही महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचून राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
