नवी दिल्ली: यूपी आणि पंजाबसह पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर काँग्रेस आज रविवारी विचारमंथन करणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि भविष्यातील रणनीती यावर चर्चा होणार आहे. यामध्ये मोदी सरकारला घेरण्याची नवी रणनीतीही आखली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी रविवारी दुपारी 4 वाजता पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था सीडब्ल्यूसीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.
सोनिया गांधी काही काळापासून सक्रिय प्रचार करत नाहीत. अशातच यूपीच्या निवडणुकीत काँग्रेसला ४०३ जागांपैकी फक्त दोनच जागा जिंकता आल्या. पक्षाच्या मतांची टक्केवारी 2.33 टक्क्यांवर घसरली आणि त्यांच्या बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून सोनियांनी पुन्हा पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी सुद्धा ऑगस्ट 2020 मध्ये G-23, पक्षाच्या नेत्यांच्या एका गटाने त्यांच्या विरुद्ध बंड केल्यानंतर पायउतार होण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु CWC ने त्यांना पुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले होते.
या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाच्या ‘G23’ गटातील अनेक नेत्यांची शुक्रवारी (12 मार्च 2022) बैठक झाली, ज्यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि मनीष तिवारी उपस्थित होते.
राजीनाम्याचे वृत्त खोटे
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी “खोटे आणि खोडसाळ” वृत्त फेटाळून लावले ज्यात गांधी कुटुंबातील सदस्य सर्व पक्षीय पदांचा राजीनामा देतील असा दावा केला होता. कथित राजीनाम्याचे वृत्त अयोग्य, खोडसाळ आणि चुकीचे असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. तसेच पक्षात कोणताही मोठा फेरबदल होणार नाही, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:

