नवी दिल्ली:- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी बिलाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. २६ नोव्हेंबरपासून शेतकरी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी दिल्लीतील मोठी ९ क्रीडासंकुले तुरूंगात रूपांतर करण्यासाठी द्यावीत, म्हणून केंद्र सरकारने दिल्ली सरकारवर प्रचंड दबाव आणला होता असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला आहे.
”जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू झाले तेव्हा दिल्लीतील ९ स्टेडियम तुरूंगात बदलण्यासाठी केंद्राने आमच्याकडे परवानगी मागितली. शेतकऱ्यांना तुरूंगात टाकायचीच केंद्राची योजना होती. आम्ही ती अजिबात ऐकली नाही. मला अनेकदा त्यासाठी फोन आले. मोठा दबाव आला पण आम्ही ऐकले नाही. मुख्यमंत्री केजरीवाल आज सकाळीच काही मंत्र्यांसह सिंघू सीमेवर पोहोचले. मात्र शेतकऱ्यांनी त्यांना मुख्य व्यासपीठावर जाऊ दिले नाही. ते म्हणाले, "मी येथे मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. अन्नदात्याचा सेवक म्हणून आलो आहे. आमचा पक्ष सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. उद्याच्या भारत बंदलाही दिल्ली सरकारने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आपचे सारे कार्यकर्ते बंदमध्ये शांततेने सहभागी होतील, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे.
केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा’
- काही पक्षांना राजकीय स्मृतीभ्रंशाचा आजार झालाय; मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला!
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- …म्हणूनच विरोधी पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात उडी घेत आहेत : रविशंकर प्रसाद
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती


