मुंबई : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. याची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. ‘कोरोना फैलावला म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा फैलाव झाला. त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे कोर्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असा चिमटा त्यांनी यावेळी केंद्र सरकारला काढला आहे.
‘मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाबाबत व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावं हे योग्य नाही असं आम्ही सांगत होतो. देशभरातील लोक निवडणुकीच्या प्रचाराला आले. तेच लोक देशभर गेल्याने त्यांनी कोरोना फैलावला. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचं भाजपचे नेते सांगत होते. पण चित्रं वेगळं आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोना फैलावला असं आपण म्हणतो. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी अनेक गोष्टी गंभीरपणे घेतात. ते मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील,’ असा विश्वास आहे,’ असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेना; रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरूच
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन

