मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासह महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा विचार करता अधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकडेवारी सादर करून तातडीने मदत करावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार आता महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात आले आहेत. २१ एप्रिल ते ३० एप्रिलच्या पुरवठ्यामध्ये महाराष्ट्राला ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार दिवसाला ४० हजार इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, केवळ २६ हजार इंजेक्शनचा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
‘केंद्र सरकारने राज्याला 21 एप्रिल ते 30 एप्रिल दर दिवशी 40 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात फक्त २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. कंपन्या किती इंजेक्शनचा साठा करत आहे. याविषयीच पत्र केंद्र सरकारला देत आहोत,’ असं मंत्री डॉ. शिंगणे म्हणाले आहेत. यासोबतच, ‘राज्य सरकार पूर्वी कंपन्यांकडून थेट प्रतिदिवस 40 हजारांपेक्षा जास्त रेमडीसीवीर इंजेक्शन खरेदी करत होतो. आता हे अधिकार थेट केंद्र सरकारने घेतले आहेत. केंद्र सरकार सांगेल तेवढाच पुरवठा आता कंपन्या करीत आहे,’ अशी माहिती देखील शिंगणे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती करू नका – राजेश टोपे
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान


