मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या.
अशात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत लस मोफत असल्याची घोषणा केली पण अवघ्या काही मिनिटांतच या दोन्ही जबाबदार मंत्र्यांवर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली आहे.
त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये मोफत लसीकरणावरून जोरदार वाद उफाळून आला आहे. तर विरोधकांनी देखील सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका केली आहे. मोफत लसीकरणावरून उडालेल्या गोंधळावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘ठाकरे सरकारमध्ये सगळेच श्रेयासाठी हापापले आहेत. काल NCP ने मोफत लसीकरणाची एकतर्फी घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेचे पित्त खवळले आहे.’ असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशातील कोरोनाच्या विध्वंसाला निवडणूक आयोगच जबाबदार, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा’
- स्त्युत्य उपक्रम : हिंगोली जिल्ह्यात शेतकरी गट माध्यमातून बांधावर खत, बियाणे
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- पंतने ‘या’ कृतीमुळे जिंकले सर्वांचे मन : पहा व्हिडीओ
- लसीच्या किंमती एकच ठेवा, नफा कमावण्याची ही वेळ नाही : केजरीवाल


