नवी-दिल्ली : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. तद्पश्चात या फोटोवरुन प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊतांनी भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्दांचा वापर केला होता. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी दिल्लीमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणीही दीप्ती रावत यांनी केली आहे.
राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु असतांना या आंदोलनाला ७ डिसें.रोजी शरद पवारांनी भेट दिली. यावेळी संजय राऊत शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर या फोटोवरुन विरोधकांकडून टीकास्त्रांचा वर्षाव होत असतांनाच राऊतांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की,’लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे.’
तसेच पुढे ते म्हणाले की,’त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालूप्रसाद यादव असे जरी कोणी नेते आले असते आणि जर त्यांनाही असा त्रास असता तर नक्की मी त्यांना स्वत: ही खूर्ची आणून दिली असती. कारण राजकारणात जरी मतभेद असले तरी ते पितृतूल्य लोकं आहेत. कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत’, असे राऊत म्हणाले होते.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरू आहेत. त्यांनीच मला हा संस्कार दिला आहे. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा. अशाने तुमचं महाराष्ट्रात कधीच राज्य येणार नाही. ही विकृती आहे. तुमच्या डोक्यातील हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्या डंपिंगमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील, असेही ते म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- ‘पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही’
- जितेंद्र आव्हाडांचा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; केली महत्वाची घोषणा
- ‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन


