मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी, ‘महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं आहे.’ असा गंभीर आरोप लगावला होता.
फडणवीस यांच्या या आरोपावर आता शिवसेना यांनी पलटवार केला असून, ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही. अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला! असा टोला सामना अग्रलेखातून लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बऱयाच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला.
महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः श्री. फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत. रस्त्यांवर आंदोलन करीत आहेत. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन खोटे आरोप करीत आहेत. सरकारच्या बदनामीच्या मोहिमा चालवीत आहेत. हे सर्व सुरळीत चालू असताना सरकारी यंत्रणा विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असे हे लोक कोणत्या तोंडाने सांगतात? विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते.
त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच. असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनसे सोबत आली तर वाईट काय?; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य
- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ची पाणीपट्टी थकीत? बीएमसीने केला खुलासा
- दानवेंची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक!
- …अन अजितदादांना आठवले ‘ते’ दिवस? फडणवीसांना म्हणाले मुख्यमंत्री!
- अमृता फडणवीसांचं नवं गाणं येणार!, ट्रॉलर्सना म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

