Share

“मराठा क्रांती मोर्चातून निघाले दलाल लोकं…” ; तरुणाच्या आक्रमक पोस्टनंतर चर्चेला उधाण

Published On: 

मुंबई : मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा क्रांती मूक मोर्चा हे मराठा समाजाचे २०१६-१७ मध्ये झालेले एक मोठे आंदोलन होते.  मराठा लोकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत मोर्चे आयोजित केले. आंदोलकांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड द्या, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा अथवा तो शिथिल करा, आणि मराठा समाजाला (शैक्षणिक व नोकरीत) आरक्षण द्या, अशा प्रमुख मागण्या केल्या होत्या. या मोर्चामुळे संपूर्ण देशभर खळबळ माजली होती. मात्र या मोर्चाच्या समन्वयकांवर आता गंभीर आरोप होत आहेत. वैभव कोकट या तरुणाने मराठा क्रांती मोर्चातून निघाले लोकं दलाल असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलच गरम आहे.

मागील काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा निवडणूक हा विषय चर्चेत आहे. परंतु आता खुद्द संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. माहाविकास आघाडी, शिवसेनेने पाठिंबा दिला नसल्यामुळे संभाजीराजेंनी माघार घेतली. मात्र संभाजीराजे समर्थक आणि मराठा क्रांती मोर्चाचे नेते महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. दरम्यान या विषयावर वैभव कोकट या तरुणाची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरत होत आहे. एकेकाळी संभाजीराजे छत्रपती यांचा कट्टर समर्थक असलेल्या या तरुणाने आपला संभाजीराजेंकडून भ्रमनिरास झाला असल्याचे फेसबुक पोस्टमधून सांगितले होते. या पोस्टमध्ये तरुणाने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांवर गंभीर आरोप केले आहेत.

“आता विषय मराठा क्रांती मोर्चावर आलाय, तर सांगतोच. मित्रहो हे आंदोलन संपल्या नंतर क्रांती मोर्चा या नावावर अनेक दलाल समोर आले. समाजातील चांगले लोकं आपल्या आपल्या कामाला गुंतले. मात्र या दलालांनी आपण म्हणजेच समाज असं चित्र तयार केलं. आज सरकार दरबारी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या लेटरहेडवर या दलालांनी ‘आम्हाला एखादे कंत्राट द्या’, ‘ह्याची बदली करा’, अशी अनेक पत्रे शासकीय विभागात दिलेली आहेत. मोर्चा कशासाठी निघाला होता अन या दलालांनी काय सुरु केले ?”, असा प्रश्न देखील वैभव कोकट या तरुणाने उपस्थित केला आहे.

समन्वयक आता इनोव्हा, एण्डेव्हर ने फिरतात-

“क्रांती मोर्चा निघायच्या आधी एसटी- बसने फिरणारे समन्वयक आता इनोव्हा, एण्डेव्हर ने फिरतात. कुठून आले एवढे पैसे? यांचे मी नावे सांगू का? आता हेच लोक समाजाला काही भेटलं नाही, यापेक्षा संभाजी छत्रपतींना महाविकास आघाडी तर्फे खासदारकी भेटली नाही म्हणून टिव्ही चॅनेल्समधून राग व्यक्त करत आहेत. समाजापेक्षा छत्रपती मोठे झाले का? संभाजी छत्रपती हे नेते असतील, तर ते ह्या दलालांचे असतील. मराठा समाजाचे नाहीत,” अशी गंभीर टीका देखील कोकाट यांनी केली आहे.

वैभव कोकट या तरुणाने मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना दलाल आहेत, असा आरोप केल्यानंतर आता जनसामान्यातून आणि विशेषतः मराठा समाजाच्या संघटनांकडून प्रतिक्रिया येत आहेत. समाजाचे ते गद्दार, ते दलाल कोण आहेत, हे वैभव कोकटने स्पष्ट करावे. त्यांची नावे जाहीर करावी, नाहीतर त्याने समाजाची माफी मागावी, अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे.

या प्रकरणावर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला. ते म्हणाले, तरुणाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही. सामाजिक वाद निर्माण होतील, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

वैभव कोकट याची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी…

‘संभाजी छत्रपती-कोल्हापूर’ हे नाव सध्या प्रचंड गाजतंय. बऱ्याच चर्चा होत आहेत. यावर लिहावं कि नाही विचार करत होतो. पण अगदी दैवत्व बहाल केल्याप्रमाणे तरुण मुले ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, हे पाहून लिहावंच म्हटलं.

सोबतचा माझा त्यांच्या बरोबरचा फोटो 2013 सालचा आहे. तेव्हा मी कॉलेज शिकत होतो. संभाजी छत्रपती यांचा खांद्यावर असलेला हात पाहून तुम्ही समजू शकता की, त्यांचे अन माझे संबंध कसे असतील! त्या काळात संभाजी छत्रपती यांना कोल्हापूर बाहेर *फारसे* कुणी ओळखत नव्हते. पुण्यात 2007 साली शैलजा ताई मोळक यांनी संपादित केलेल्या ‘बुधभूषणम’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात अजित दादासोबत ते पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले, तो योग प्रवीणदादानींच जुळवून आणला, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या संभाजी छत्रपतींचा कोल्हापूरच्या जनतेने दणदणीत पराभव केला होता.

तेव्हा अंबाजोगाईच्या एका व्यक्तीने त्यांना प्रथम मराठवाड्यात आणून, लोकांना ओळख करून दिली. आमची पण त्यांच्याशी ओळख झाली. त्यांना पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणी विचारत नसताना अंबाजोगाईचे काही लोकं दरवेळी त्यांचे भव्य असे स्वागत- सत्कार करायचे.

मराठा संघटनांनी आझाद मैदानात त्यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण मोर्चा काढलेला. त्याला मी उपस्थित होतो. त्यानंतर ‘शिव-शाहू यात्रा’ काढली. असं म्हणतात, की या यात्रेचा सगळा खर्च आणि नियोजन मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड व इतर चळवळी यांनी केले होते. यातही मी त्यांच्या सोबत काही ठिकाणी फिरलो. या यात्रेत ते प्रत्येक सभेत म्हणायचे की, ‘आमदार- खासदार- मंत्री पेक्षा छत्रपती पद महत्वाचे आहे! मी कधीच राजकीय पद घेणार नाही!’

2014 ला राज्यात आणि केन्द्रात सरकार बदल झाला. ‘भाजप’कडून राजेंना खासदारकी ऑफर आली, असं त्यांनी दाखवलं. पण त्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले होते. खासदारकीसाठी आपल्या तोंडचे शब्द ते विसरले आणि छत्रपती पदाला दुय्यम मानून त्यांनी स्वहितासाठी खासदारकी स्वीकारली.

राजे खासदार झाले…

तर आता राजे खासदार झाले, अनेकांना त्याचं चांगले वाटलं, काहींना नाही. राजे खासदार झाले पण राजेंना खासदार पदापर्यंत पोहोचवण्यामागे अनेक हात होते. त्यांना ते आपसूकच विसरून गेले. अगदी राजेंना राजवाड्या बाहेर काढून जनतेत नेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी कधी विचारलं नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो. संभाजी राजे यांच्या नांदेड येथील सभेसाठी संतोष गव्हाणे (ज्यांना तुम्ही ओळखताच) यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि राजेंच्या स्वागत-सत्काराचा जंगी कार्यक्रम केलेला. या माणसावर केसेस पडल्या, पण संभाजी छत्रपती यांनी त्यांना साधं कधी विचारलंही नाही. संतोष गव्हाणे या माणसाच्या आयुष्याची वाताहत झाली. हे फक्त एक उदाहरण झाले. असे अनेक संतोष गव्हाणे आहेत, की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे वंशज म्हणून या व्यक्तिवर वेगवेगळ्या प्रकारे प्रचंड पैसा अन वेळ खर्च केली. म्हणून यांना खासदारकी मिळाली. पण यांनी त्या लोकांना ठेंगा दाखवला.

राजे खासदार झाले, मराठा समाजाला काय मिळाले ?

मराठा समाजाला काही सरकारी सुविधा मिळाल्या, त्या फक्त ‘मराठा क्रांती मोर्चा’मुळे! बाकी संभाजी छत्रपती यांच्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 6 मराठा तरुणांना पण स्वतःच्या पायावर उभा केलेले नाही, आज जे त्यांच्या ‘सपोर्ट’मध्ये मीडियात विखारी बोलतात ते कोण? नाशिक, पुणे, नगर, बीड, औरंगाबाद मधील क्रांती मोर्चातून निघालेले दलाल लोकं! ते कोण आहेत? स्थानिक भागात त्यांची इमेज काय आहे ? याची जरा माहिती घ्यावी. त्यांची नावे अनेकांना माहिती असतीलच.

आता विषय मराठा क्रांती मोर्चावर आलाय, तर सांगतोच. मित्रहो हे आंदोलन संपल्या नंतर क्रांती मोर्चा या नावावर अनेक दलाल समोर आले. समाजातील चांगले लोकं आपल्या आपल्या कामाला गुंतले. मात्र या दलालांनी आपण म्हणजेच समाज असं चित्र तयार केलं. आज सरकार दरबारी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या लेटरहेडवर या दलालांनी ‘आम्हाला एखादे कंत्राट द्या’, ‘ह्याची बदली करा’, अशी अनेक पत्रे शासकीय विभागात दिलेली आहेत. मोर्चा कशासाठी निघाला होता अन या दलालांनी काय सुरु केले ?
क्रांती मोर्चा निघायच्या आधी एसटी- बसने फिरणारे समन्वयक आता इनोव्हा-एण्डेव्हरने फिरतात. कुठून आले एवढे पैसे ? यांचे मी नावे सांगू का ?

आता हेच लोक समाजाला काही भेटलं नाही, यापेक्षा संभाजी छत्रपतींना महाविकास आघाडी तर्फे खासदारकी भेटली नाही म्हणून टिव्ही च्यानल्सच्या मधून राग व्यक्त करत आहेत. समाजापेक्षा छत्रपती मोठे झाले का ? संभाजी छत्रपती हे नेते असतील,तर ते ह्या दलालांचे असतील. मराठा समाजाचे नाहीत. क्रांती मोर्चा हा विषय खूप लांबला आपण मूळ विषयावर येऊ…

राजेंना फडणविसाने रायगड प्राधिकरणाच्या प्रमुख पदी नियुक्त केले. सरकार बदलले आणि राजेंना चाहूल लागली की आपली रायगड प्राधिकरण वरून उचलबांगडी होणार! मग त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदा घेऊन रायगड प्राधिकरण मध्ये असा असा भ्रष्टाचार झाल्याचे लोकांसमोर मांडले. हे घोटाळे ते प्राधिकरणाचे प्रमुख असतानाच झाले होते बरे. MVA सरकारने त्यांना कायमस्वरूपी पुढे अध्यक्ष केल्यावर त्यांनी आरोप केलेला भ्रष्टाचारच गायब झाला. असो पुढे जाऊ…

संभाजीराजे, इथे भरपूर लिहायचे होते, पण हा भाग रिकामा ठेवतो. संभाजीराजे यांनी संघर्षात सोबत असणाऱ्या लोकांना कधी शब्दाने पण विचारलं नाही. हे खोटं वाटत असेल 2014 पर्यंत त्यांच्या सोबत असणाऱ्या हजारो सहकार्यांना विचारा, त्यातील किती जण आज त्यांच्या सोबत दिसतात ? असं सगळ्यांना फाट्यावर मारत त्यांची खासदारकीची टर्म हि संपली. चळवळीतल्या चाणाक्ष लोकांनी हे प्रॉडक्ट लगेच ओळखले. चळवळीच्या जीवावर हे मोठे झाले यांनी चळवळीला 6 वर्षात काय दिले ? उलट यांच्यामुळे चळवळीत राजकीय इच्छाशक्ती वाढल्याने चळवळ दुभंगली, संपली, प्रचंड नुकसान समाजाचे झाले. यांच्या जवळच्या सर्कलमध्ये जे आले त्यांना ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीचा प्रत्यय येतो, सदैव सोबत असणारे अनेक जण खासदार झाल्यावर हि यांना सोडून गेले. आता हे सगळे सोडून देऊ नव्याने पुन्हा खासदार करण्याच्या यांच्या मागणीकडे पाहू…

तर संभाजी छत्रपती यांना दुसऱ्यांदा खासदार करावे,

खरं तर मी माझ्या कॉलेजवयात जसं त्यांच्या व्यक्तीमत्वाला भुललो होतो; तशी काही मुले फार भुलून गेलेली आहेत. संभाजी छत्रपती म्हणजे आताचे शिवाजी महाराज आहेत, असेच ते समजू लागले. अनेकांना छत्रपती घराण्यातली लोकं म्हणजे फार काही थोरं वाटत. पण ह्या महान घराण्यातल्या लोकांना खासदारकी- आमदारकी हेच ‘छत्रपती पदापेक्षा मोठे’ वाटते.

मागे आम्ही विनायक मेटेच्या नावाने शिव्या घालायचो. विनायक मेटे हा माणूस कसा का असेना, पण त्याने आमदारकीसाठी कधी जाहीर भिका मागितल्या नाहीत. समाजाच्या जीवावर 5 टर्म आमदारकी उपभोगली, म्हणून त्यांना पूर्वी नावे ठेवली गेलीत. याचे आज वाईट वाटते. कारण ह्यांच्या तुलनेत मेटे खूपच बरे होते, असे म्हणायची वेळ यांनी आणली. खासदारकीसाठी घराणे भोळ्याभाबड्या समाजाला हे वेठीस धरत आहेत.
भाजपने राजेंची साथ का सोडली ?

भाजपने राजेंना दुसऱ्यांदा खासदार का केले नाही? कारण भाजपला राजेंचा उपयोग आणि उपद्रवमूल्यता शून्य वाटली. मागच्या 6 वर्षात छत्रपती पक्षात असूनही मराठा समाजाचा म्हणावा तसा पाठिंबा त्यांना मिळाला नाही. म्हणून त्यांनी यावेळेस राजेंना वाऱ्यावर सोडले. अन्यथा भाजपला एक खासदार करणे फार अवघड नाही. विनय सहस्त्रबुद्धे ऐवजी राजेंना पाठवता आले असते. तसेच देशातून कुठूनही खासदार केले असते. पण भाजपने ओळखले की, ह्या व्यक्ती मागे जनाधार नाही. हे 100टक्के सत्यही आहे.

आता संभाजीराजे यांच्या राजकीय ताकदीकडे वळू. संभाजी छत्रपती हे लोकांतून कोणत्याही निवडणुकीला उभा राहिले तर ते निवडून येणार नाहीत. ते काल परवा बोलले कि छत्रपती घराण्याचा सन्मान टिकवण्यासाठी मला खासदारकी द्यायला हवी. उद्या सरदारांचे वंशज पुढे येतील आणि म्हणतील की, आमच्या घराण्याचा सन्मान टिकवण्यासाठी आम्हाला विधानपरिषद, महामंडळ द्या! असे देता येईल का ? त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला कुठल्याही इलेक्शनमध्ये लोकांतून निवडून आणले तरी मी ढोपरापासून राजेंना मुजरा करेल…

माझा तरुण कार्यकर्त्यांना मेसेज आहे की…. आपण छत्रपती घराण्याच्या प्रेमापाई अगदी वेडावले असता, तर राजर्षी शाहू महाराज यांच्या नंतर छत्रपती घराण्यात कोणाचा आदर्श घ्यावा, मान-सन्मान करावा अशी व्यक्ती राहिलेली नाही, हे आधी लक्षात घ्या. आता जे वंशज आहेत, ते सत्तापिपासू आहेत. लोकांतून निवडून येणार्यांबद्दल मला आदर आहे. पण जे स्वतःच्या फायद्यासाठी समाज आणि छत्रपती घराण्याचा वापर करतात, हे पाहवत नाही म्हणून हे लिहले आहे… तरुण मुलांनो आपण चांगले शिका, उमेदीचा वेळ यात घालू नका, नोकरी-व्यवसाय करा, विदेशात जा, समाजाचा आपोआप उद्धार होईल!

नेत्या सोबतचे लोकं, सल्लागार कोण आहेत ? त्यावर नेता कसा होतो, हे अवलंबून असते. एकेकाळी चळवळीतल्या विद्वान लोकांच्या सोबत असणाऱ्या या माणसाच्या आजूबाजूला आज कोण लोकं आहेत ? सल्लागार कोण आहेत ? याचे निरीक्षण करा.

मला कल्पना आहे कि हे सर्व लिहून मी अनेकांचा रोष अंगावर घेतला आहे, पण समाजाचा कोणी कडिपत्त्या सारखा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करावा अन मुलांना इतिहासाच्या खाईत लोटावे हे मनाला पटलं नाही. म्हणून लिहिले. राजेंनी राजकारणात खूप मोठे व्हावे, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती व्हावं पण स्वतःच्या कर्तृत्वावर, समाजाचे भांडवल करून नाही. एवढेच माझे प्रांज्वळ मत आहे. राहिला विषय छत्रपती घराण्याच्या सन्मानाचा तर वंशजांनी राजकारणाच्या चिखलापासून लांबच राहिले तर घराण्याचा मान-सन्मान अबाधित राहील, बाकी माझे अन त्यांचे काही वैर नाही.

(टीप: फार आखडत्या हाताने लिहले आहे, जे लिहलं आहे, ते मला माहिती असलेल्या माहितीच्या 1% च लिहीले आहे. कृपया याचा प्रतिवाद करू नये किंवा माझ्यावर वैयक्तिक टिका-टिप्पणी राजेभक्तांनी करू नये, झाकली मूठ सव्वालाखाची, उघडण्याची वेळ आणू नका. हि प्रेमळ विनंती अन्यथा पार्ट दोन वाचायला भेटेल)

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!