औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व तयारी जोरदार सुरू आहे. सावंगी आणि हर्सुल या तलावाचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. तलाव फुटीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.२२) सावंगी आणि हर्सुल तलावाचे सर्वेक्षण केले. यात सावंगी तलावाच्या भिंतींना भेगा पडल्याचे निदर्शनास आले. तर हर्सूल तलाव सुरक्षित असून या तलावात सध्या बारा फुटापर्यंत पाणी आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.
राज्याच्या हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पावसाळयापूर्वी तलाव, धरणांचे सर्वेक्षण करुन ऑडीट करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. पालिकेच्या मालकीचा हर्सुल तलाव आणि सावंगीचा पाझर तलाव आहे. हर्सुल तलावातून शहरातील १४ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र सावंगीच्या पाझर तलावातील पाणी शेतीला उपयोगी पडत असून येथून जवळच्या गावांना पाणीपुरवठा होत आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता अशोक पद्मे, एन. पी. गिरी, महेश चौधरी, गणेश मानकापे यांच्या पथकाने सावंगी पाझर तलावाची शनिवारी पाहणी केली. यामध्ये पाझर तलावाच्या भिंतीला भेगा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सावंगी तलावातील पाणी कमी झाले असून उन्हामुळे या भेगा पडल्या असाव्यात. आता या भेगा तातडीने बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तर गतवर्षी नाशिकच्या पथकाने हर्सूल तलावाचे ऑडिट केले होते. त्यांच्या अहवालानुसार हर्सूल तलावाला पावसाळ्यात कोणताही धोका नसल्याचे किरण धांडे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- एसटीतील कोरोना योध्यांचे शासन मदतीसाठी पात्र आठ प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडून!
- लसीकरणामुळेच कोरोना आटोक्यात येईल; पण सरकारला चिंताच नाही : राहुल गांधी
- परमबीर सिंह यांना मोठा दिलासा; ९ जूनपर्यंत अटक करणार नसल्याची राज्य सरकारची ग्वाही !
- कोरोनाची तिसरी लाट: औरंगाबादेत बालकांसाठी ७३७ बेड्सची व्यवस्था
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

