औरंगाबाद : औरंगाबाद मनपा कधी निवडणूक कधी जाहीर होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात भारतीय जनता पक्षानेही सुत्रे हलवत मंडळनिहाय आढावा घेण्याचे ठरवले आहे. याची जबाबदारी पक्षनेते, प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने औरंगाबादेत देखील दोन्ही पक्षांचा काडीमोड झाला आहे. एकवेळचे मित्रपक्ष असलेले हे दोन्ही पक्ष आता एकमेकांचे हाडवैरी झालेत. शिवसेनेन राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे. मात्र, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा प्रत्येक पक्ष करत आहे.
त्याचबरोबर नाईलाजाने म्हणा अथवा आवडीने, भाजपलाही यंदाची निवडणूक एकट्यानेच लढावी लागणार आहे. त्या पार्श्वभुमीवर वरिष्ठ आणि स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचेही काम सुरू केले आहे. या निवडणुकीसाठी अगोदरच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रमुख निवडणूक प्रभारी तर, आमदार अतुल सावे यांच्याकडे निवडणूक प्रमुख आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे.
यानंतर गेल्या काही दिवसांपासून बुथनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आता मंडळनिहाय आढावा घेण्याची जबाबदारी थेट पक्षनेते, प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे. यात क्रांती चौक मंडळाची जबाबदारी खासदार डॉ. भागवत कराड यांच्याकडे, आमदार अतुल सावे यांच्याकडे गुलमंडी मंडळ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याकडे हडको मंडळ, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर व प्रवीण घुगे यांच्याकडे अनुक्रमे चिकलठाणा व सातारा मंडळ देण्यात आले आहे. यासह प्रदेश पदाधिकारी असलेले मनोज पांगारकर, भगवान घडमोडे, किशोर शितोळे हे अन्य मंडळाचा आढावा घेणार आहेत. निवडणुकीत ११५ जागांपैकी भाजपने ‘मिशन ६० प्लस’ हाती घेतले आहे. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर बीडचे राजकीय भवितव्य अवलंबून!
- विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणाचे ‘पोषण’? ५० किलोच्या गोणीत फक्त ३५ किलो तांदूळ!
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?


