पुणे – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी धाड टाकलीय. त्यासोबतच अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या सर्व घडामोडी घडल्याने देशमुख आणि पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. खा. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत नवीन आघाडी संदर्भात बैठक बोलावली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखण्यासंदर्भात प्राथमिक बोलणी या बैठकीतून करण्यात आली.
दरम्यान, भाजपच्या विरोधात पवारांनी एवढे मोठे पाऊल उचलल्यानंतर काहीतरी प्रतिक्रिया येणारच असे अंदाज बांधले जात होते. यामुळेच भाजपच्या रडारवर असलेल्या अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली असल्याची चर्चा आहे. यातच काल अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकारणीत सीबीआय चौकशीबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार यांच्यावर देखील चौकशीची टांगती तलवार असणार आहे असे देखील बोलले जात आहे. ही सर्व कृती करून शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा भाजपकडून दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत आम्हाला या चौकशीची चिंता नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांनी म्हटलं, अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठी होत आहे. या गोष्टी आम्हाला नव्या नाहीत, या गोष्टीची आम्हाला कसलीही चिंता नाही. देशमुखांच्या चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही. ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न तयार झाला आहे असे ते म्हणाले. दरम्यान, आगामी काळात देशमुख आणि अजित पवार यांच्या खरंच अडचणी वाढणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘…आम्ही एकत्र पुढे जाऊ’ ; पराभवानंतर कोहलीचे भावनात्मक ट्विट
- भाजपचे सर्व नेते धुतल्या तांदळाचे, EDची पिडा फक्त विरोधकांच्या मागेच का ?
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया


