सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील सार्वजनिक जीवनातून गायब झाले आहे. त्याचवेळी धाकटे नातू विशाल पाटील मात्र अधिक जोरकसपणे सक्रीय आहेत. त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी नुकतीच दिली आहे. मात्र, सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा निवडीवरून काँग्रेसमध्ये असणारी गटबाजी यानिमित्त समोर आली. जिल्हाध्यक्ष पद विशाल पाटील यांना हवे होते. परंतू मंत्री विश्वजित कदम गटाचे आमदार विक्रम सावंत यांची जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लागली. यामुळे विशाल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी वर्णी लागली.
या निवडीवरून विशाल पाटील आणि वसंतदादा गट नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपने विशाल पाटील यांना ‘संपर्क’ केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सांगलीतील कृष्णाकाठावरील वसंतदादा स्फूर्तीस्थळावर बुधवारी सायंकाळी वसंतदादा गटाचा दिशा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी विशाल पाटील यांनी भाजपाच्या ‘ऑफर’वर भाष्य केले.
‘प्रदेश उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर मी नाराज असेन, असा विचार करून लगेच भाजपच्या नेत्यांनी मला ‘ऑफर’ दिल्या. पण शेकडो अदानी, अंबानी निर्माण केले तरी वसंतदादांचे घराणे काँग्रेस सोडणार नाही. वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील, वसंतदादांचे विचार पैशाने निर्माण झाले नाही, त्यांच्या विचारांनी गर्दी होते, असे सांगत विशाल पाटील यांनी भाजपवर टीका केली.
‘नोकरीत आई-वडिलांच्या पश्चात एकाच मुलाला एकदाच अनुकंपा तत्त्व लागू होते. आमच्यात मोठे बंधू प्रतीक पाटील यांना तो फायदा मिळाला होता. आता माझा तो हक्क नाही. वारसाहक्काने नव्हे, तर कर्तृत्वाच्या बळावर पुढे जायचे आहे. त्याची तयारी केली आहे. यापुढील काळात कार्यकर्ते आणि स्वतःच्या ताकतीच्या जोरावर पद आणि उमेदवारी मिळवू असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग; सुशिक्षित लोकांसह महिलांनाही दिली जाणार संधी
- एसबीआयच्या नावाने ‘हा’ मेसेज आल्यास व्हा सावध!
- अनिल देशमुखांना हाय कोर्टाचा दणका; याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
- प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन सेनेला मराठवाड्यात आणलं- चंद्रकांत पाटील
- सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच शेहनाजला बसला धक्का


