🕒 1 min read
रत्नागिरी – पश्चिम बंगालमध्ये भाजपने जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न जनआशिर्वाद यात्रेतून राबवून समाजासमाजात तेढ निर्माण करायची… लोकांची माथी भडकवायची आणि राजकीय पोळी भाजायची हाच भाजपचा कार्यक्रम देशात आणि राज्यात सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत केला.भाजपने शुक्रवार पासून जन आशिर्वाद यात्रा सुरू केली असून या यात्रेची पोलखोल करण्याची मोहीम राष्ट्रवादीने उघडली आहे. सोमवारी अलिबाग येथे पत्रकार परिषद झाल्यानंतर आज रत्नागिरीत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रसरकारवर हल्लाबोल केला.
सात वर्षे भाजप जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करत आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने भाजप जनआशिर्वाद मागायला जात आहे अशी जोरदार टीकाही संजय तटकरे यांनी केली. भाजपच्या सात वर्षाच्या कारकिर्दीत आलेख हा खालावलेला पाहायला मिळत आहे. नोटबंदी करुन सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले. जीएसटी परतावा वेळेत परत न केल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडला त्यामुळे विकासाची गती मंदावली आहे. युपीए सरकारच्या काळात जीडीपी ८-१० टक्क्यांनी वाढत होता तर आजची जीडीपी ग्रोथ मायनसमध्ये म्हणजेच दीड टक्क्यावर आली आहे. त्याचा परिणाम सरळसरळ बेरोजगारीवर झाला. ४५ वर्षात एवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी या सात वर्षात वाढली. मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देतो असे वचन दिले त्या वाचनाबद्दल जनआशिर्वाद यात्रेत काही बोललं जात नाही.
रोजगार देणं राहु द्या ८ कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. तो परत मिळायची शक्यता मावळली आहे. २०१६ मध्ये अरुण जेटली अर्थमंत्री असताना कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यावरून २५ टक्क्यावर आणला त्यामुळे वर्षाला साडे सहा लाख कोटी तोटा येऊ लागला. ती तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल डिझेलचे दर वाढवून ठेवले. महागाईने त्यामुळे डोके वर काढले. केंद्रसरकार पेट्रोल डिझेलचे साडे चार लाख कोटी रुपये जमा झाल्याचे सांगत आहे त्यातून जो मोफत लसीकरणावर खर्च व शेतकऱ्यांच्यावर खर्च करत असल्याचे दाखवत आहे. मात्र अख्ख्या देशाचा मोफत लसीकरणाचा खर्च हा ३० हजार कोटीचा आहे. शेतकऱ्यांना मदत करतो ती ६ हजार रुपये वर्षाला त्याचे अकाऊंट ७० हजार कोटीवर आहे. उरलेले साडेतीन लाख कोटीचे काय करतात. जो फायदा उद्योगपतींना करुन दिला. त्याचा भुर्दंड सामान्य माणसाच्या खिशातून पैसे काढून ही तूट भरून काढत आहेत असा आरोपही संजय तटकरे यांनी यावेळी केला.
बेरोजगारीचा डाटा यांच्याकडे नाही… यांच्याकडे आर्थिक परिस्थितीची माहिती नाही. हे डाटाहीन केंद्रसरकार आहे. लोकांची फसवणूक करणे हा एकमेव धंदा भाजपकडे आहे असा आरोपही संजय तटकरे यांनी केला. पेगॅसससारख्या प्रकरणातून देशातील महत्त्वाच्या लोकांवर हेरगिरी करण्यात आली. यावर संसदेत मोदी सरकारने उत्तर न देता संसदेचे कामकाज गुंडाळून पळ काढला. मंत्रालयात न येता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक नंबरवर कसे असे चंद्रशेखर बावनकुळे विचारत आहेत. मग देशाच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त ४५ मिनिटे थांबतात मग मोदी लोकप्रिय कसे व लोकशाही व देशाचे प्रतिनिधित्व करायला लायक कसे याचं उत्तर बावनकुळे यांनी द्यायला हवे अशी मागणीही संजय तटकरे यांनी केली आहे.
भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेला ‘जनमाफी यात्रा’ म्हणायला हरकत नाही असे सांगतानाच कोकणाची व महाराष्ट्राची भाजपने माफी मागायला हवी अशी मागणीही संजय तटकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात राजकीय संवादाचे वातावरण आहे. राजकीय सलोख्याचे आहे. पक्षापक्षामध्ये राजकीय मतभेद असतील पण ते राजकीय असावेत. वैयक्तिक पातळीवर जाऊन टिकाटिपणी कृपया कुणी करु नये असे आवाहनही संजय तटकरे यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राजन सुर्वे, कुमार शेटये, बशीर मुर्तुझा, बाप्पा सावंत, सुदेश मयेकर, योगेश शिर्के, जुबेर काझी, साहिल आरेकर आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटावर केआरकेची टीका, म्हणाला…
- ‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
