बीड : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल २ तास ३० मिनिटे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर त्यांचा ताफा बाहेर निघाला असता कोविडच्या काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मच्याऱ्यांना निवेदन घेऊन भेटू दिले नाही म्हणून या शेकडो कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला आहे.
या प्रकारावरून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. कंत्राटी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कोरोना संकटात काम केले. आजही करत आहेत. पण त्यांच्या रास्त मागण्यांची दखल घ्यायला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळ नाही. निवेदन देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची टोपेंना लाज वाटते का असा सवाल धस यांनी विचारला आहे.
तसेच परिचारिकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज होणे ही दुर्दैवी घटना आहे. हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला याची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी धस यांनी परिचारिका यांच्यासोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासाठी शेकडोच्या संख्येने विविध नागरिक जमा झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना कंत्राटी कर्मचारी आत जाण्यास इच्छूक होते. पण त्यांना जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार आणि राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघताच त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. पण या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेताच वाहनांचा ताफा पुढे निघाला. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. म्हणून पोलिसांना या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर


