बाळासाहेबांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्य- संजय राऊत

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांची आज(२३ जाने.)९६ वी जयंती. व्यंगचित्रकार ते राजकीय नेते असा बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवास आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयी भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ते ९६ वर्षांचे असते. योद्ध्याचे वय मोजायचे नसते. मृत्यूनंतरही तो जिवंतच असतो व लढण्याची प्रेरणा देत असतो. बाळासाहेब ठाकरे हे त्या अर्थाने कधीच म्हातारे झाले नाहीत. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांचे वाढदिवस जोरात साजरे झाले, पण वय मोजलेले त्यांना आवडत नसे. बाळासाहेब म्हणजे राजकारणातला एक मनोवेधक विषय ठरला. त्यांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्यच होते. त्या नाट्यास बहुरंगी छटा होत्या.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. या स्थितीत बाळासाहेब ठाकरे ‘मातोश्री’वर असते तर त्यांची काय भूमिका असती, असा मिश्कील प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहात नाही. विशेषतः महाराष्ट्रातील भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेबांनी कोणत्या मार्मिक टिपण्या केल्या असत्या? त्यांच्या मनात व्यंगचित्रांच्या कोणत्या रेषा उमटल्या असत्या? बाळासाहेब हे व्यंगचित्रकार होते. त्यांनी कुंचल्यांचे फटकारे मारायला सुरू केले तेव्हा पंडित नेहरू, गुलझारीलाल नंदांपासून स. का. पाटील, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी असे लोक राजकारणात होते. जगजीवनराम, इंदिरा गांधी, मोरारजींवर व्यंगचित्रकार म्हणून त्यांचा विशेष लोभ होता. बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे सोडले तेव्हा ते म्हणाले, ‘मी फटकारे मारावेत अशी मॉडेल्स आता राहिली नाहीत. पण अचानक राजकारणात नरसिंह राव, सीताराम केसरी, सोनिया गांधींचा उदय झाला तेव्हा ते हळहळले.’ मी कुंचला खाली ठेवल्यावर ही ‘मॉडेल्स’ आली. यांच्यावर व्यंगचित्रे काढताना मजा आली असती. अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून काय विचार करतात हे पाहायला धम्माल आली असती. आज राजकारणात व्यंगबहार सुरू असताना बाळासाहेब आपल्यात नाहीत.

महत्वाच्या बातम्या: