Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत

मुंबई : साउथ चित्रपट इंडस्ट्रीसाठी २०१९ हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले आहे. हे वर्षभर जरी चित्रपटगृहे उघडली नाहीत, पण या उद्योगाने चांगले चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले. यंदा ओटीटीपासून ते सिनेमागृहापर्यंत फक्त साऊथचे चित्रपट चर्चेत आहेत. आता भारताबाहेरही दक्षिणेतील चित्रपट अकादमी पुरस्कार (ऑस्कर २०२२) (Oscar २०२२) पर्यंत पोहोचले आहेत, जो जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी जगभरातून २७६ चित्रपट निवडले गेले आहेत.

ज्यामध्ये दोन भारतीय चित्रपट आहेत आणि हे दोन्ही चित्रपट दक्षिणेतील आहेत. यामध्ये सूर्याच्या (Suriya) ‘जय भीम’ (Jai Bhim) आणि मोहनलालच्या (Mohanlal) ‘मरक्कर’चा (Marakkar: Arabikadalinte Simham) समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट २०२१ मधील सर्वात यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहेत. भारतात प्रतिष्ठा मिळवल्यानंतर ते परदेशातही आपली कीर्ती पसरवण्यासाठी सज्ज आहेत.

दरम्यान सुर्याच्या प्रोडक्शन हाऊस 2D ने आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून, ‘जय भीम’च्या ऑस्कर शर्यतीत सामील झाल्याची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘ऑस्करच्या शर्यतीत! अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेल्या २७६ चित्रपटांच्या यादीत ‘जय भीम’चाही समावेश झाला आहे. ९४व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन.’ चाहते प्रचंड प्रमाणात लाईक, शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.

‘जय भीम’ चित्रपटामध्ये सुर्या वकील चंद्रूची भूमिका साकारत आहे, तर त्याच्यासोबत प्रकाश राज, राव रमेश, राजिशा विजयन आणि लिजो मोल जोस देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल यांनी केले असून, त्याची कथाही त्यांनीच लिहिली आहे. ‘जय भीम’ची निर्मिती सुर्याची प्रोडक्शन कंपनी 2D एंटरटेनमेंटने केली आहे.

तसेच प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरक्कर’ हा मल्याळम चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट आहे. यात मलबार सागरी अधिपती कुंजली मरक्कर IV आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या लढ्याची कथा सांगितली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आणि सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन, असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

९४व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी २७ जानेवारीपासून मतदान सुरू होणार असून, १ फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ८फेब्रुवारी २०२२ रोजी ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह सर्वत्र याबद्दल प्रचंड चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या