“ही परिस्थिती १९९४ सारखीच, तेव्हा माझ्या वडिलांना…”; उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी काल (२१ जानेवारी) भाजपला सोडचिठ्ठी देत राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले. उत्पल यांना तिकीट न देऊन भाजपने पणजी मतदारसंघातून प्रदीर्घ काळ मनोहर पर्रीकर प्रतिनिधित्व करत असलेले विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान नाराज असलेले उत्पल पर्रीकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

उत्पल यांनी दावा केला की त्यांना “तिकीट नाकारणे ही परिस्थिती १९९४ सारखीच होती, तेव्हा माझ्या वडिलांना पक्षातून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र मनोहर पर्रीकर यांना जनतेचा पाठिंबा असल्याने त्यांना हाकलून लावता आले नाही. ते अजूनही (त्यांच्या वडिलांचे विरोधक) पक्षात ‘उच्च पदांवर’ आहेत. उत्पल यांनी वडिलांच्या निधनानंतर झालेल्या २०१९ पणजी पोटनिवडणुकीचा उल्लेख केला. ‘समर्थन’ असतानाही त्यांना त्यावेळी तिकीट देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय जनता पक्ष सोडणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता आणि भाजपने पणजीतून “चांगला उमेदवार” उभा केला तर  मी निवडणूक लढवणार नाही, असे देखील उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

भाजपने मॉन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे. उत्पल म्हणाले की, त्यांचे वडील राजकारणात ‘घराणेशाही’च्या विरोधात होते. त्यांनी मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून तिकीट मागितले नव्हते.

महत्वाच्या बातम्या: