“मी ज्ञानदान करतो, पैसा देण्याचं काम माझं नाही”, डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर

सोलापूर : डिसले गुरुजींना जगाच्या पातळीवरील मोठी शिष्यवृत्ती मिळाली, त्यांनी वयक्तीक फायदा सोडता शाळेसाठी काय केलं? असा सवाल सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याने केला होता. त्याला ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजीत डिसले गुरुजी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझं काम ज्ञानदान करण्याचं आहे. अर्थार्जनाचं आणि पैसा देण्याचं काम माझं नाही, असे डिसले गुरुजी म्हणाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते रणजित डिसले यांना अमेरिकेतील प्रतिष्ठीत समजली जाणारी फेलोशिप मंजूर झाली आहे. त्यासाठी त्यांनी शिक्षण विभागाकडे रजा मागितली होती. मात्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अर्ज प्रलंबित ठेवल्याने डिसले गुरुजींनी शिक्षणाधिकाऱ्यांवर विविध आरोप केले होते. तसेच राजीनामा देणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जातीने लक्ष घालत डिसले गुरुजींच्या रजा मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यानी प्रतिक्रिया देताना विविध सवाल उपस्थित केले होते. डिसले गुरुजींनी शाळेसाठी काय दिलं? असा सवाल सोलापूर जिल्हा परिदेच्या शिक्षणाधिकाऱ्यानी विचारला होता. त्यावर डिसले गुरुजी म्हणाले, मला पुरस्कार मिळाल्यानंतर अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाळेला काय मिळालं? खरं तर शिक्षक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असतो. अर्थार्जनाचं, पैसा देण्याचं काम करत नाही. कुणाचीही ती अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. मात्र ज्ञानदानाचं काम मी निष्ठेने करत आहे आणि करत राहील, असे डिसले गुरुजी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या