“हायकमांडने झापल्यानंतर नाना पटोलेंनी कथित ‘मोदी’ तयार केला”; भाजप खासदाराचा आरोप

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातीलचं नाही तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. “मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारू शकतो”, अशा प्रकारचं वक्तव्यं नाना पटोले यांनी केलं होतं. यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर नाना पटोले यांनी मोदी नावाचा गावगुंड आहे त्याच्याबद्दल बोलत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान हा कथित गावगुंड समोर अल्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

उमेश घरडे असे त्याच नाव असून भंडारा पोलीस त्याची चौकशी करत आहेत. उमेश घरडे हा लाखणी तालुक्यातील गोंदी गावचा रहिवासी आहे. नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मीच तो गावगुंड आहे, असे म्हणत उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने काल (२१ जानेवारी) माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणले आहे. मात्र पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उमेश घरडेला चांगलाच घाम फुटला होता. त्याने अनेक प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्यामुळे नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड हाच आहे की हे केवळ एक थोतांड आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी कांग्रेस हायकमांड ने झापल्यानंतर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कथित मोदी नावाचा गाव गुंड तयार करून पत्रकारांसमोर उभा केल्याच्या आरोप केला आहे. सुनील मेंढे म्हणाले, नाना पटोलेंनी या प्रकरणात दिशाभूल करण्यासाठी हा केविलवाला प्रकार केला आहे. कथित मोदी नामक व्यक्तिवर यापूर्वी व आता कोणतेही गुन्हे दाखल नसताना त्या व्यक्तीला मीडिया सामोर आणल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.

काय म्हणाला गावगुंड मोदी?

“मी दारू विकत होतो, दारू पितो, माझी पत्नी मला सोडून गेलेली आहे. मी नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच २०२० पासून मला मोदी असं टोपण नाव पडलं आहे,” असे उमेश घरडे यांनी म्हटले आहे.

एकही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही

पोलिसांनी अटक केलेल्या या कथित मोदी उमेश घरडे विरोधात एकही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही. त्यामुळे त्याला गावगुंड म्हणायचे कसे, असा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. पोलिसांनी उमेश घरडे याची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे.

महत्वाच्या बातम्या :