औरंगाबाद : औरंगाबादकरांना आठवड्यातून दोनदा पाणी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती. याविषयी आयुक्तांना सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र सध्याची गरज, मिळणारे पाणी व जीर्ण झालेल्या योजना यांचा विचार करता आठवड्यातून दोन दिवस पाणी देणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण नुकतेच आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची आठवड्यातून दोनदा पाणी हि घोषणा निव्वळ स्टंटबाजी ठरली आहे.
१६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र ही योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी साधारणपणे १५ ते २० एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. शहराचे पाण्याचे वेळापत्रक गेल्या काही वर्षांपासून कोलमडले आहे.
महापालिका तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात काही भागात आठ दिवसाआड तर काही भागाच चार-पाच दिवसाआड पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शहरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई होती. मात्र त्यानंतर पावसाळ्यातही परिस्थिती बदललेली नाही. यामुळे अनेकांवर विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.
त्यावेळी देसाई म्हणाले होते, शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन येत्या सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाने एकत्रित प्रयत्नातून शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे. त्यादृष्टीने पाणीपुरवठा साठवण क्षमता वृध्दी करण्यास प्राधान्य देऊन पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवावी. शहराच्या जुन्या भागातील ज्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती आवश्यक असेल त्याठिकाणी ती तातडीने करुन घ्यावी, असे निर्देशित केले होते.
मात्र यास आठवडा उलटून अजूनही मनपाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. याबाबत आयुक्त पांडेय यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, दोन्ही पाणी पुरवठा योजनेचे आयुष्य संपले आहे. वाढीव पाण्याचा प्रवाह या योजना सहन करतील का? हा देखील विषय आहे. तरीही २० एमएलडीपर्यंत पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या स्पष्टीकरणावरुन सध्यातरी औरंगाबादकरांच्या नशिबी आठवड्यातून दोनदा पाणी हे एका स्वप्नासारखेच असल्याचे दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारशी पंगा अंगलट ; ट्विटर विरोधात पाचवा गुन्हा दाखल
- ‘राज्य सरकार काय करतंय, तर बिल्डरांना सवलती देतंय’, भाजपचा हल्लाबोल
- …अन् आठवले म्हणाले, ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’
- ‘आयुष्य खूप सुंदर आहे…’ ; IPS अधिकारी लांडेंनी दिला युवकांना ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘मोदीजी का काम ही निराला हैं, राफेल में भी घोटाला हैं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

