🕒 1 min read
मुंबई : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तसेच एसटी महामंडळाला दिवसाला १२ कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याने आता महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने एक जाहीर पत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकातून कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा एकदा रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे पत्र जसेच्या तसे
‘कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. तरीही सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.
कर्मचारी बांधवांनो, आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (२८ टक्के ) व घरभाडे भत्ता (८, १६, २४ टक्के ) मान्य केले आहे. तसेच दिवाळी भेट ही दिली आहे. असे असून देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे, त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य शासन मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे प्रामाणिकपणे अनुपालन करत आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने आपले कार्य सुरु केले आहे.
बंधु भगिनींनो, आपण संप मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुध्दा विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. अर्थात, संपाचा विपरीत आर्थिक परिणाम संस्था आणि संस्थेचे कर्मचारी म्हणून आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळे गेली कित्येक दिवस सर्व सामान्य प्रवाशी जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या सर्वांचा विचार करुन आपण तातडीने संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजु व्हावे हीच आपणांस विनंती’, असे आवाहन महामंडळाने केले आहे पत्रामध्ये केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय’
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

