मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले आहे. “हे लॉलीपॉप बजेट आहे, आणि भाजपने त्यांच्या जुन्या आश्वासनांना मूठमाती दिली असून आता देशाची दिशाभूल करण्यासाठी पुढील २५ वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १०० स्मार्ट सिटी, ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, महागाईवर नियंत्रण, प्रत्येक बेघराला घर, अशा अनेक घोषणा केल्या होत्या. परंतु अशा अनेक जुन्या महत्वाकांक्षी घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप दिसून येत नाही. हे अपयश झाकण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २५ वर्षांच्या विकासाचे नवे स्वप्नरंजन करण्यात आले असून, ही देशाची दिशाभूल व फसवणूक आहे.”
तसेच अशोक चव्हान यांनी अर्थसंकल्प पटकन उरकल्याबद्दल मोदी सरकारची टीका केली. ते म्हणाले, “या अर्थसंकल्पाला भाजप नेते ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणून संबोधत आहेत. परंतु यंदाचे अर्थसंकल्पीय भाषण मागील काही वर्षातील सर्वात लहान भाषण आहे. केंद्राकडे भरीव असते, तर ते त्यांनी भाषणात सांगितले असते. परंतु, सांगण्यासारखेच काहीच नसल्याने हे भाषण संक्षिप्त झाले असावे.” यावेळेस अर्थसंकल्पाचे भाषण पावणेदोन तास चालले.
निर्मला सीतारामन यांनी दरवेळेस प्रमाणे यावेळी ही त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात श्लोक वापरला. त्यावर टीका करताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘महाभारतातील श्लोक आणि ‘अमृतकाल’,‘गतीशक्ती’सारखे मोठमोठे शब्द वापरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वजन वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी, बेरोजगार, नोकरदार, लहान-मोठे व्यावसायिक व उद्योजक आणि गरिबांसाठी त्यात काहीच नसल्याने हा अर्थसंकल्प पोकळ ठरला आहे.’
महत्वाच्या बातम्या:
नितेश राणे यांना जामीन मिळवण्यासाठी आधी शरण जावं लागेल – अनिल परब
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आजपर्यंतचे सर्वात छोटे अर्थसंकल्पीय भाषण!
‘हे अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहा’; छगन भुजबळांची टीका
‘अर्थसंकल्पात देशवासीयांची फसवणूक’; शिवसेना नेते विनायक राऊतांची टीका


