मुंबई : राज्य सरकारने वाईन विक्रीला किराणा दुकान आणि जनरल स्टोअर्समध्ये मूभा दिली आहे. आता वाईनप्रमाणेच गुळापाासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन व मोहाच्या फुलांची वाईन विक्रीला किराणा दुकान आणि मॉलमध्ये मूभा देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. याबाबत सदाभाऊंनी ट्विट करत माहिती दिली आहे.
सदाभाऊ मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हणतात, महोदय, आपल्या महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानामध्ये आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे, त्याचं महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आनंदाने स्वागत करत आहे. आपल्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस येणार आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी आपल्या घरावर या निर्णयामुळे गुढी उभा करून स्वागत केले आहे.
वाईन प्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन व मोहाच्या फुलांची वाईन मॉल व किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी परवानगी मिळणेबाबत मी मुख्यमंत्र्यांना @CMOMaharashtra पत्र लिहून मागणी केली. pic.twitter.com/51LenuRI5D
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) February 5, 2022
या पत्राद्वारे आपणास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून देत आहे कि, आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुळ व्यवसाय हा सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. अनेक गुऱ्हाळघरे बंद पडलेली आहेत. ही गुऱ्हाळघरे जर नव्याने पूर्वीसारखी चालवायची असतील तर गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला परवानगी देण्यात यावी.

सदर वाईन हि कमी खर्चात तयार करता येईल. गुळाची वाईन तयार करायचे कारखाने गावागावांमध्ये उभे करता येतील. यातून रोजगार तर वाढेलच पण ऊस उत्पादकांना सोन्याचे दिवस येतील. तसेच आदिवासी शेतकऱ्यांनाही आपणांस न्याय द्यावा लागेल. मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्या वाईनच्या विक्रीला देखील परवानगी द्यावी, कारण सध्या आपण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहात. म्हणूनच छोट्या-मोठ्या मद्यनिर्मिती करणाऱ्या ग्रामीण भागातील पारंपारिक मद्य निर्मात्यांना आर्थिक बळकटी मिळावा, यासाठी द्राक्षाच्या उत्पादकांप्रमाणेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील आपण दिलासा द्यावा, अशी मी आपल्या महाविकास आघाडीकडून अपेक्षा व्यक्त करतो. असे पत्र सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

