महाराणा प्रताप रझाकारी वृत्तीसमोर झुकले नाही; त्यांच्या पुतळ्याला होणारा विरोध मोडून काढू- अंबादास दानवे

औरंगाबाद: महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाचा स्वाभिमान आहे. एक वेळ चंद्र झुकू शकतो, सूर्य झुकू शकतो परंतु महाराणा प्रताप हे कधीही दुश्मनांसमोर झुकले नाहीत. ते कधीही देशविघातक, रझाकारी वृत्तीसमोर झुकले नाहीत. त्यामुळे इम्तियाज जलील यांना प्रेरणा कुठून मिळणार त्यांचा इतिहास तर भावाभावांमध्ये भांडण, राज्यासाठी भावाला मारणारे बापाला जेलमध्ये टाकणारे असा त्यांचा इतिहास आहे तर एकीकडे हिंदूसूर्य महाराणा प्रतापांचा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या शहरात महाराणा प्रतापांचा पुतळा होणार. याला जर कोणी विरोध केला तर तो विरोध शिवसेना मोडून काढेल असा इशारा आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी थेट इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांना दिला आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली आहे.

महाराणा प्रतापांचा पुतळा होणारच

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या या मागणीला आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. ते म्हणाले, महाराणा प्रताप यांनी हळदी घाटीत गवत खाऊन दुश्मनांचा मुकाबला केला. मात्र आपले डोके, आपले शील त्यांनी कधीही झुकवले नाही. एमआयएमवाले काहीही बरळत असतात. त्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा संभाजीनगरात होणारच. पुतळ्याला एमआयएम किंवा अन्य कोणीही विरोध करत असेल तर तो विरोध कसा मोडून काढायचा? हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. तो विरोध आम्ही सहज मोडून काढू. त्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा होण्यापासून कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकत नाही असेही दानवे म्हणाले.

काय म्हणाले होते इम्तियाज जलील?

महाराणा प्रताप उदयपूर, मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर आहे. ते लहानपणा पासूनच शूर, निर्भय, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. अशा थोर, महान शूरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल. कारण त्यांच्या पासुन प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिकी शाळांंमधुन देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतील. येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या