खासदार इम्तियाज जलील स्वतः विनामास्क; कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कारवाई करणार कोण?

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये ३ हजार ३३० रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात ओमायक्रोनचेही रुग्ण आढळून येत आहेत. राज्यशासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाद्वारे शहरात कडक निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील(Imtiyaj Jaleel) पुन्हा एकदा नियमांची पायमल्ली करत आहेत. शुक्रवारी अबरार कॉलनीत झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला होता. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत पोलीस प्रशासन दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.

शहरातील अबरार कॉलनी या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. खासदार इम्तियाज जलील यांचा स्थानिक विकास निधीतून अबरार कॉलनीत सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन देखील टाकण्यात येणार आहे. या कामांचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२१) जलील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात माझ्याकडून कुठली चांगली काम होऊ नयेत विकास कामे होऊ नयेत यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र अबरार कॉलनीत झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती नागरिक आबालवृद्ध लहान मुले मोठ्या संख्येने या वेळी सहभागी झाली होती.

यावेळी इम्तियाज जलील त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात एमआयएमच्या कार्यकर्त्यांची तसेच नगरसेवकांची उपस्थिती होती. या गर्दीतील नागरिकांनी तसेच खुद्द खासदार इम्तियाज जलील यांनी देखील मास्क लावलेला नव्हता. कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन याठिकाणी करण्यात आलेले नाही. मात्र प्रशासनाला या गर्दीशी कुठलेही सोयरसुतक नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून याआधी देखील संसर्ग पसरला होता. मात्र एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जलील यांनी अशा कार्यक्रमांना जाणे टाळायला हवे असा देखील सूर निघत आहे.

महत्त्वाच्या बातम्या