धक्कादायक; औरंगाबादेत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ३ हजार रुग्णांपैकी १ हजार रुग्ण लसीकरण न झालेले..!

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये ३ हजार ३३० रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र महापालिकेकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार यामधील तब्बल १ हजार ७५ जणांनी लसीचा एकही डोस आत्तापर्यंत घेतलेला नाही महापालिकेने या रुग्णांना संपर्क केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे यातून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात महापालिकेला आलेले अपयश दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसात शहरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस दिवसात ६ हजार नागरिक आढळून आले आहेत. यातील अनेक जण ओमायक्रोनचे देखील शिकार होतांना दिसून येत आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशनला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अधिकांश प्रमाणात रुग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. महापालिकेने या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या वॉर रूममधून होम आयसोलेशन मधील रुग्णांशी दररोज संपर्क साधला जात आहे.

वॉर रूममधून होम आयसोलेशन मधील रुग्णांना संपर्क साधण्यात आला. यामध्ये ३ हजार ३३० रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. यात २ हजार ४४ रुग्ण हे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आढळून आले. तर २२१ जणांनी पहिला डोस घेतलेला होता. तर १ हजार ७५ जणांनी एकही डोस घेतलेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महानगरपालिका जनजागृती करण्यात कुठे कमी पडली? तसेच एवढे नागरिक विनालसीकरण वावरत असतांना महापालिकेचे लक्ष कुठे होते? लसीकरण न झालेल्या नागरिकांना दंड करण्यासाठी नेमलेल्या पथकाने काय केले असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या