औरंगाबाद : शहराचा स्मार्ट सिटीला साजेसा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहरातील उद्योजक एकवटले आहेत. सर्वंकष रोडमॅपच्या माध्यमातून सर्वसहमतीने त्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. निमित्त होते महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आयोजित केलेल्या उद्योजक संवादसत्राचे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री या नात्याने ध्वजारोहण सोहळ्यासाठी सुभाष देसाई हे औरंगाबादेत आले होते. त्यादरम्यान, त्यांनी शहरातील आघाडीचे उद्योजक व उद्योग क्षेत्रातील संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे (सीएमआयए) अध्यक्ष कमलेश धूत, कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआय) प्रमुख मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरचे (एमएएसएसआयए) अध्यक्ष अभय हंचनाल यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, ऋषी बागला, लघु व मध्यम उद्योगांचे प्रतिनिधी अनिल पाटील, राहुल मोगले, दुष्यंत आठवले आदी उद्योजक प्रतिनिधी या संवादामध्ये सहभागी झाले होते.
राज्याचे युवा नेते व पर्यटन, पर्यावरणविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी डेव्हलपमेंट डायलॉग या विकासाभिमुख संवादसत्राच्या माध्यमातून शहरात खुला संवाद साधला होता. शहर विकासाचा रॉडमॅप आखण्याचे आणि त्यासाठी एनजीओप्रमाणे को-गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या (सीजीओ) माध्यमातून वाटचाल करण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. तसेच त्यासाठी क्षेत्रनिहाय छोटे तज्ज्ञगट स्थापन करण्याचे आवाहनदेखील केले होते. या पार्श्वभूमीवर उद्योजकांच्या या संवादगटातून शहर विकासाकरिता अतिशय उपयुक्त विचारविनिमय करण्यात आला.
यापुढील काळात ठरावीक कालावधीनंतर या अभ्यास गटाची बैठक आयोजित करून विकास आधारित प्रकल्प अंमलबजावणीची निश्चिती करण्याचे ठरवण्यात आले. या संवाद सत्राला उद्योगविश्वातून दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या माध्यमातून त्यासाठी सर्वतोपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.
उद्योजकांनी केलेल्या सूचना
– इंडस्ट्री टास्क फोर्स तयार करून त्याचे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट निश्चित करणे
– ऑरिक सिटी प्रकल्प विकास आणि मार्केटिंग आराखडा करणे
– शहरात इन्व्हेस्टमेंट, इंडस्ट्री एक्स्पोसारखे उपक्रम राबविणे
– शहरातून निर्यात आधारित प्रकल्पांना चालना देणे
– पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून विशिष्ट प्रकल्पांना वाहिलेल्या विकास यंत्रणा (स्पेशल पर्पज व्हेईकल) विकसित करणे
– ऑटो, स्टील, फार्मा, इंजिनिअरिंग, आयटी अशा सर्वांगीण उद्योग विकास आराखडा तयार करणे
– वाळूज येथे ड्राय पोर्ट, फ्लायओव्हर आदी पायाभूत सुविधा विकसित करणे
संपादकांसमवेत अनौपचारिक चर्चा
उद्योगमंत्री आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहर व परिसरातील सर्व प्रमुख दैनिकांच्या संपादकांसमवेतदेखील अनौपचारिक चर्चा केली. शहर विकासाकरिता माध्यमांचा पुढाकार आणि सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच सकारात्मक दृष्टिकोनातून शहर विकासाकरिता सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर संपादकांशी साधलेला संवाद उपयुक्त ठरला. सर्व संपादकांनीदेखील शहर विकासाकरिता आपल्या प्रकाशनाच्या वतीने कटिबद्धता दर्शवित अतिशय सकारात्मक संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या
- ‘सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवण्याची आता वेळ आली आहे’
- भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी राम मंदिर निर्माणासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी!
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- तासगावच्या उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय रेंदाळकर यांची एकमताने निवड; शहरात जल्लोष
- शेतकरी आंदोलन फुटीच्या उंबरठ्यावर ? व्ही एम सिंह यांच्या गटाची आंदोलनातून माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

