पुणे : राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून याआधी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
असाच एकप्रकार खेड (राजगुरूनगर) येथे घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर पंचायत समितीचे सदस्य आपल्या बाजूने करून घेतले होते, असा आरोप करत स्थानिक शिवसेना नेते हे तीव्र नाराज होते. आता हे प्रकरण वाढलं असून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वतः खेडमध्ये दाखल होत शिवसैनिकांची बाजू ऐकून घेतली.
यानंतर, दिलीप मोहिते यांच्यासह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आक्रमक इशारा दिला होता. मी जे काही बोलत आहे, ते मानाचं सांगत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच मी बोलत आहे. महाराष्ट्रात चांगलं सुरू असताना पुण्यात कुरबुरी करणारे लोक असतील तर अजित पवारांनी त्यांचा बंदोबस्त करावा. जर अजित पवाराचं ऐकत नसेल तर आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनी एकोप्याने राहायचं ठरवलंय. त्यानंतर दुसऱ्या फळीत आम्ही देखील एकमेकाला व्यवस्थित साथ देतोय. मात्र, हे खालपर्यंत रुजायला वेळ लागेल. जिथे शिवसेना-राष्ट्रवादी किंवा शिवसेना-काँग्रेस अशी लढत झाली तेथील कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. नगरमध्ये देखील आम्ही प्रयत्न केला. आम्ही तालुकास्तरावरील आमच्या नेत्यांना सांगू, शिवसेनेने देखील त्यांच्या नेत्यांना सांगावं. अशा पद्धतीने यावर तोडगा निघेल,’ असं भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर : मोठ्या झुंबरासह पीओपी स्लॅब कोसळला अन् आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’


