मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.
दरम्यान, कोरोनाचा फटका सर्व उद्योग व्यवसायांसह शिक्षण क्षेत्राला देखील बसला आहे. प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये काही काळ सुरु करण्यात आले होते. मात्र, पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंद करण्यात आले. यामुळे गेले दीड वर्ष शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरत नसून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व परीक्षा सुरु आहेत, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका बसत असून आता पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेशांचा घोळ निर्माण होत आहेत.
अशात शिक्षण विभागाने गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला (TC/LC)नसल्यास सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या कोरोना काळात असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याचे कळत आहे, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.
काय म्हटलंय जीआर मध्ये ?
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा T.C/L.C उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे.
विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
पूर्वीच्या शाळेकडून LC/TC प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्यांचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला ‘शिवप्रसाद’ देणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप !
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- राम मंदिरासाठीच्या निधीबाबत राष्ट्रवादीकडूनही चिंता, केली ‘ही’ मागणी
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

