ठाणे : महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नसल्याचे वारंवार समोर येत असताना आता महिला अधिकारी देखील राज्यात सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. याचे कारण म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
कल्पिता पिंपळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या नराधम फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून एका पत्रकाराने त्यांची भेट घेतली असता त्यांनी अशा हल्ल्यांना घाबरून न जाता कायदे मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. ‘फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मी संध्याकाळी गेले होते. आधी स्टाफने जवळपास कारवाई केली होती. मी खाली उतरून पाहणी करत असताना मागून माझ्यावर हल्ला केला. मग ते कोणाला तरी समजलं आणि हल्लेखोराला ढकललं. मी स्वतःचा हात पाहिला तर खूप रक्त वाहत होतं आणि दोन बोट नव्हती,’ असं म्हणत त्यांनी थरार सांगितला.
पुढे त्या म्हणाल्या, ‘कारवाई चालूच ठेवणार. आपण त्यांना घाबरून कारवाई बंद नाही करू शकत. त्यांना खास घाबरणार ? माझं ते कामच आहे. त्यांना घाबरलो तर फेरीवाले कायदे हातात घ्यायला लागतील,’ असं म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका जाहीर करत पुन्हा हिंमत कायम असल्याचं दाखवलं आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त करत जेव्हा हा बाहेर येईल तेव्हा याची बोटं छाटली पाहिजे. नाहीतर यांचा उन्माद वाढत जाईल, असा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरलीये, मंत्र्यांची अजून मोठी यादी तयार’; चंद्रकांतदादांच्या विधानाने खळबळ
- ‘सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? शिवसेना खासदार मागच्या दाराने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला’
- ‘सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी त्यांच्या वडिलांना विचारावे’ ; चंद्रकांत पाटलांचा टोला
- ‘राज्यातील नेत्यांना हात जोडून विनंती करतो ओबीसींच्या हक्काचे हिरावू नका’
- ‘होय, हे स्वातंत्र्ययुद्धच ! रँड असाच वागायचा तेव्हा चाफेकर बंधुंनी आवाज उठवला; आताही…’


